महाराष्ट्र

ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १० : राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मंत्रालयात सोमवारी  यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर पवार यांच्यासह ग्रंथालय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात ई ग्रंथालय चळवळीला चालना मिळावी असे सांगून श्री.मुनगंटीवार म्हणाले, पुढील बैठकीत ग्रंथालयासंदर्भातील सर्व कायद्यांचे सादरीकरण करण्यात यावे. राज्यातील सर्व ग्रंथालये संगणकाच्या माध्यमातून जोडली जावीत, त्या माध्यमातून संवादाचे एक चांगले व्यासपीठ निर्माण करावे, अनुदानित ग्रंथालयांच्या निरिक्षणाचे काम तठस्थ यंत्रणेकडून करून घेण्यात यावे.

राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर समित्या स्थापन करून राज्यातील ग्रंथालयांची व्यवस्था उत्तम कशी करता येईल याचा ग्रंथालय संचालनालयाने अभ्यास करावा. राज्यात “अ,ब,क,ड” या श्रेणीत ग्रंथालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. यात काही सुधारणा करता येईल का याचाही संचालनालयाने विचार करावा.  ग्रंथालये, स्वच्छ, हवेशीर,अद्ययावत असावीत, वाचकांची वाचनाची अभिरूची लक्षात घेऊन तिथे पुस्तके उपलब्ध असावीत, ग्रंथालयातील पुस्तकांमधून स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन मिळेल, संशोधनाला सहाय्य मिळेल अशी पुस्तके तिथे असावीत, भाषेची समृद्धता जपतांना ग्रंथालयाने एक अभिरूची संपन्न वाचक समाजात निर्माण व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुढील बैठकीत जिल्हानिहाय ग्रंथालयांची यादी द्यावी,असे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यात एकूण १२१४८ ग्रंथालये आहेत, त्यात ३३४ अ वर्ग, २१२० ब वर्ग, ४१५३ क वर्ग, ५५४१ ड वर्ग ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांचा एकूण कर्मचारी वर्ग २१ हजार ६११ इतका आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!