भारत महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार लातूर जिल्ह्याचा विशेष सन्मान

नवी दिल्ली , 18 : महाराष्ट्रातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्य हस्ते आज गौरविण्यात आले, तर लातूर जिल्ह्याचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या सचिव रिना रे, सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्ष अनिता करवाल उपस्थित होते.

याप्रसंगी देशभरातील एकूण 52 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी 37 शाळा या ग्रामीण भागातील तर 15 शाळा शहरी भागातील आहेत. एकूण 52 पैकी 45 शाळा या शासकीय अथवा शासकीय अनुदान प्राप्त आहेत. 7 शाळा खाजगी आहेत. आज प्रदान झालेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख असे आहे. 50 हजार रूपये शाळांच्या खात्यात डिजीटल सेवेतंर्गत जमा करण्यात आलेले आहेत.

लातूर जिल्ह्याला 3 पुरस्कार

महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणा-या लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये निलंगा तालुक्यातील जाऊ येथील मुलींची शासकीय निवासी शाळेस स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय मुख्यम आणि विद्यार्थ्यीं यांनी पुरस्कार स्वीकारला.

लातूर जिल्ह्यातीलच रेणापूर तालुक्यामधील बाऊची येथील मुलींची शासकीय निवासी शाळेला स्वच्छतेचे निकष पूर्ण केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सामाजिक न्याय आयुक्त, शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार आणि विद्यार्थी यांनी स्वीकारला.

लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी.जी.अरवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातील केवळ 9 जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हिंगोलीतील गोटेवाडीच्या आश्रम शाळेला पुरस्कार

हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी येथील ‘पोस्ट बेसिक आश्रम शाळे’ला स्वच्छतेच्या सर्व कसोटया पुर्ण केल्याबद्दल ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरिवण्यात आले. पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल राठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर आणि विद्यार्थी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!