संपादकीय

…..तर मग आपला बाप्पा नक्की कोण?

     
आज पाच दिवसाचा पाहुणचार घेऊन गौरी आणि बहुसंख्य गणपती आपल्या गावाला रवाना होतील आणि पाच दिवस गौरी-गणपतीमुळे भरलेले, सजलेले घर रिकामे रिकामे नि भकास वाटू लागेल. घरचे हे पाच दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जित झाले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या राजांच्या, इच्छापूर्ती गणेशांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडते.  अमुकगावचा राजा, तमुकवाडीचा राजा, नवसाचा गणेश, इच्छापूर्ती सिध्दीविनायक ही आणि अशी नावे देऊन सगळीकडे या मंगल उत्सवाचा बाजार मांडला आहे. या मंडळांसाठी तर हा गणेशोत्सव नसून ११ दिवसांचा पैसा वसूल इव्हेंटच असतो.
      रस्ते अडवून, चौक बळकावून, वाहतुकीची कोंडी करून, जाहिरातीच्या मोठमोठ्या कमानी उभ्या करून, मंडप उभे करून, मंडपांमध्ये मोठमोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक लावून त्यावर गाणी लावत (गाणी कोणतीही असोत भक्ती गीते वा अजून इतर एका मर्यादेनंतर सगळ्याचाच त्रास होतो) आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असला तरी हे असाच हा गणेशोत्सव साजरा करीत असतात. कधी-कधी भारतातील ऐतिहासिक वास्तूंचे देखावे तर कधी मंदिरेही या गणेशोत्सवाच्या निमित्ताने उभी केली जात असतात. जर असे काही उभे करणार असले तर दोन-दोन महिने आधीपासून तिकडचे रस्ते, चौक सर्वांसाठी बंद ठेवले जातात. पण या मंडळांकडे हा सण एव्हढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी लागणारा पैसा येतो कुठून, हा मोठा प्रश्नच आहे. सामान्य जनतेकडून, लहान-मोठ्या दुकानदार व व्यावसायिकांकडून कधी गोड बोलून तर कधी धाकधपटशा दाखवून ही वर्गणी(? की खंडणी?) गोळा करून हे असे मोठमोठ्या राजांचे, इच्छापूर्ती सिध्दीविनायकांचे, नवसाच्या गणेशांचे मंडप उभे असतात आणि अशा या  सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अबालवृध्द भक्तगण ८-८, १०-१० तास रांगेत उभे राहून जातात, त्याच्याकडे नवस बोलले जातात आणि ते पूर्ण करण्यासाठी काही रूपयांपासून डाॅलरपर्यंत व नारळापासून हिरे-माणके, सोने-चांदीच्या वस्तू, अलंकारांपर्यंत त्या राजाच्या पेटीत दान म्हणून पडत राहते. लाखों-करोडों रूपयांची रोकड व अशा वस्तू या राजांच्या पायाशी अकरा दिवस रोज जमा होत राहतात. मनात हा प्रश्न येतो ज्याची घरी भक्तीभावाने तुम्ही प्राणप्रतिष्ठा करता त्या बाप्पात काय उणे असते का म्हणून तुम्ही ‘त्या राजा’कडे एव्हढ्या गर्दीत ताटकळत उभे राहून दर्शन घेता नि नवस मागता? की तुमच्या घरच्याच बाप्पावर तुमचा विश्वास नसतो? त्याच राजाचे इतके आटापिटा करून दर्शन घेतल्याने समाधान मिळत असेल तर घरी तरी कशाला प्राणप्रतिष्ठा करायची?
     संत सांगून गेले की देव हा भक्तीचा भुकेला असतो, मनःपूर्वक नमस्कार केला तरी त्याला तो पोहोचतो, ही सारी सृष्टी त्याचीच आहे आपल्याला जे मिळते ते त्यानेच दिलेले आहे ….असे जर असेल तर मग लाखो-करोडोंची रोकड, ऐवज हे कशासाठी त्याला अर्पण करायचे नि का अर्पण करायचे? की हे करण्यामागे कोणाची दुसर्‍यांचीच आपण भर करत असतो याचा सारासार विचारही कोणी करत नाही. दोन्ही गोष्टी आपणच बोलतो नि तसे वागतोही पण त्या एकमेकांच्या किती विसंगत आहेत हे आपण पाहातही नाही.
      घरातील बाप्पांची वर्षभर किती आतुरतेने वाट पाहत असतो, त्याच्यासाठी कंठा, मुकूट,  मोत्यांची माळ, सजावटीचे सामान पारखून आणतो,… आरास, मखर यासाठी रात्रंदिवस नोकरी-व्यवसाय सांभाळून जागरणे करून मनापासून बनवतो….त्याचे आगमन झाल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजा-अर्चा, आरती, वेगवेगळ्या पदार्थांचे नैवेद्य. .सर्व सर्व कुठेही न कंटाळता, न थकता उत्साहाने करत असतो तर मग मनःपूर्वक केलेला नमस्कार आपल्याच बाप्पापर्यंत पोहोचत नाही का? आपला बाप्पा आणि तो राजाही मूर्तीकारांनीच घडवलेला असतो, त्याची पूजा आपल्यासारखी माणसेच तिथेही करत असतात मग फरक का करतो आपण? उलट या सार्वजनिक मंडळांच्या राजांच्या दर्शनाला जाता त्यापेक्षा घरच्या बाप्पाला तुमचा आमचा नमस्कार जास्त भावणार कारण घरातील बाप्पासाठी इतकी मनोभावे भक्तिभावाने सेवा केलेली असते ती ८-१० तासांच्या रांगेत उभे राहिल्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. आपणच एकीकडे म्हणतो की देव सगळीकडे एकच आहे, त्याची रूपे जरी अनेक असली तरी तो एकच आहे, आपण कुठेही असलो तरी त्याची नजर आपल्यावर आहे. मग हे विचार घरचा बाप्पा नि मंडळाचा राजा यात फरक करताना कुठे जातो?
      सार्वजनिक गणेशोत्सवातील या ‘राजांना’ कोणी एव्हढे मोठे केले? कोणी प्रसिद्धी दिली की अमूक एका राजाचे मूर्तिकाराने पाऊल बनविण्यापासून प्रतिष्ठापना होईपर्यंत त्याची प्रसिद्धी सर्व वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमांद्वारे केली जाते? मोठ-मोठे मराठी, हिंदी चित्रपट, मालिका कलाकार, उद्योजकांना स्वतः निमंत्रित करून ही अशी प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी केली जाते. सामान्य जनता भोळी त्यांना वाटते की इतकी मोठी माणसे या राजाच्या दर्शनाला जातात म्हणजे हा राजा नक्कीच खास आहे आणि मग एक गेला की दुसराही जातो तो मग status issue होतो …एक मेंढी खड्ड्यात पडली की सगळ्या एका पाठोपाठ पडतात तसे हे आहे तो गेला मग मी ही जाणार. का जायचे,  कशाला जायचे याचा सदसद्विवेक बुध्दीने विचार न करता फक्त अनुकरण करत राहतात आणि त्या राजाच्या दरबारात मावणार नाही इतकी गर्दी करत राहतात.  ज्या राजाच्या दारात तुम्ही काही तासांच्या रांगेत उभे राहता आणि मग  कंटाळलेल्या, थकलेल्या, ढकलाढकली करून, तेथील  कार्यकर्त्यांनी त्या राजाच्या पायासमोर आपले डोके आपटल्यावर फक्त एका क्षणासाठी(कारण दुसर्‍या क्षणाला तुम्हाला तिथून बाजूला केलेले असते) हात जोडतो हे किती मनःपूर्वक असेल(पहिला विचार हाच की झाले एकदाचे दर्शन…यात समाधानापेक्षा उरकले हा भाव जास्त दिसतो), किती त्या राजापर्यंत पोहोचेल की त्यापेक्षा  घरातील बाप्पांची चार-पाच दिवस सेवा करून, मिळालेल्या समाधानाने त्याला नमस्कारासाठी जोडलेले हात त्या गणाधिशाच्या चरणी अर्पित होईल? सगळेच जरा विचार करू या. तो जर अमूक तमूक गावचा,  वाडीचा राजा असेल तर मग आपला हा घरी मनोभावे पुजलेला बाप्पा कोण आहे?

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!