प्रासंगिक लेख

जा रे माझ्या माहेरा…. “बंधू येईल माहेरी न्यायला गौरीगणपतीच्या सणाला…”

    श्रावण संपत आला आणि भादव्याची चाहूल लागली की, सासुरवाशिणींना माहेरी जाण्याचे वेध लागतात आणि माहेराकडून येणाऱ्या संदेशाची, बोलावण्याची, आणि घेऊन जाणाऱ्या मुराळ्याची ती वाट पाहू लागते. भावाची वाट पाहू लागते कधी तो आपल्याला माहेरी घेऊन जायला येईल????
“गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला…”
     गौरी-गणपतीचा सण म्हणजे स्त्रियांचा हक्काचा माहेरी जाण्याचा सण. गणपतीच्या सणाचे वेध लागताच प्रत्येक सासुरवाशिणीला माहेरची ओढ लागते. माहेरची माणसे, मैत्रिणी या सर्वांच्या आठवणीने तिचे मन व्याकुळ होऊ लागते.
     लेक माहेराला आली की, माऊलीला लेकीचे कोण कौतुक असते!!!! तिचे कौतुक करायचे, तिला हवे नको ते पाहायचे, तिच्या आवडीचे पदार्थ करून ती माऊली लेकीला खाऊपिऊ घालत असते. खरेतर लेकीला यातील काहीच नको असते तिला माहेरी आल्याचा, आईला भेट्ल्याचाच आनंद खूप असतो.
“माझं माहेर सावली, उभी दारात माऊली
तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा…
..
मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा…”
     आईच्या पदराची सावली मिळताच तिचा सारा त्रास, थकवा, शीण नाहीसा होतो. सासुरवाशीण माहेरी आली की, गणपतीच्या सणाला खरा उत्साह भरतो. गौरी आवाहनाच्या दिवशी लेक नवी साडी चोळी लेऊन, वेणी फणी करून, गजरा माळून, नटून थटून गौर आणायला निघाली की आईला खरी गौर आल्यासारखा आनंद होतो. गौर आल्यावर जसे घर दार आनंदात सुखात नाहत असते तसेच लेक आल्यावरही आनंद साऱ्या घरात भरून राहतो. सुख, समृद्धी, आनंद, सौभाग्य घेऊन आली असे वाटू लागते.
     अशी सुख-समृद्धी घेऊन आलेली लेक-गवर आणि तिच्या मैत्रिणी सारी रात्र झिम्मा, फुगडीचे खेळ खेळतात, घागरी फुंकतात, सुपे नाचवतात….असे अनेकविध खेळ खेळून जागरण करतात, लेकीला असे आनंदात हसता खेळताना पाहून माहेरची माणसेही मनोमन सुखावतात.
“घागर घुमूं दे घुमूं दे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा गवर माझी लाजू दे…
..
गवर गौरी गं गौरी गं झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे…”
     आणि अशा या झिम्मा फुगडीच्या गाण्यातून सासरहून आलेली माहेरवाशीण आपल्या माहेराला सुख-समृद्धी देण्याचे आवाहन या गौरी मातेला करते. जशी तू घरात येऊन घरात आनंद निर्माण केलास तसेच रानात शेतात जाऊन तिथेही तू समृद्धी दे अशी ती देवीकडे मागणे मागते.
     पण सगळ्याच सासुरवाशिणींना माहेरी जाण्याचे सुख मिळतेच असे नाही. लग्नाच्या थोड्या वर्षांनी हे थोडे मागे पडत जाते. सासरची आणि मुलांची जबाबदारीमुळे तिला माहेरी जाण्यास मिळत नाही. ती शरीराने जरी सासरी असली तरी, मनाने मात्र कधीच माहेरी पोहोचलेली असते.
“घाल घाल पिंगा वारा माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात…”
     माहेरच्या प्रत्येक गोष्टीची तिला प्रकर्षाने आठवण येत राहते.
“काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी करी गं बेजार,
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुले वेचायला नेशील तू गडे…”
     यावेळी तिला माहेरी जात येत नाही याचेही दुःख तिला आहे ते ती आपल्या आईला मनातल्या मनातच बोलूनही दाखवते आणि माहेरच्या आठवणींनी तिचे मन कसे व्याकुळ झाले आहे, हेही सांगते…
“विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरच्या सुखाला गं मन आचवल
फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओला चिंब होतो…..”
     सासुरवाशीण मग तिच्या लग्नाला कितीही वर्षे झालेली असोत तिला माहेरची अशी ओढ नेहमीच लागलेली असते. ती कधीच कमी होत नाही. मग ती नंतर आपली ही हौस आपल्या मुलीच्या रूपात पूर्ण करून घेते. आपली मुलगी सासरहून माहेरपणाला आली की तिची सर्व हौसमौज पूर्ण करून आपलीही इच्छा पूर्ण करून घेत असते आणि स्वतःला मुलीच्या जागी पाहत समाधान मानून घेत असते.
    अशा माहेरपणाला आलेल्या लेकीची गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर साश्रू नयनांनी पाठवणी केली जाते. पुढच्या गौरी-गणपतीच्या सणाला येण्याचे आश्वासन घेऊनच. माहेरवाशीणही मागे पुढे पाहत आपल्या सासरची वाट जड अंतःकरणाने आणि जड पावलाने चालू लागते माहेरच्या आठवणी मनात आणि अश्रू डोळ्यात घेऊनच.
सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!