फ्लॅगशीप योजना तातडीने राबवण्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना
ठाणे दि २८ : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाच्या बाबतीत कारणे सांगण्यापेक्षा एकजुटीने काम करायला हवे तरच जिल्ह्याचा शाश्वत विकास होईल. यासाठी तुम्ही करत असलेल्या कामाला दर्जेदार वेळ द्या असा कानमंत्र कोंकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सन २०१६-१७ च्या वार्षिक तपासणी टिपणी अहवाल वाचन कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांनी जिल्ह्याचा विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागात योजना राबवताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्या संवर्गाणी कामाचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
पाटील म्हणाले, सरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने काम करा. संस्थात्मक काम करताना ती संस्था स्वतःची आहे या भावनेने काम करायला हवे तरच योजनांची फलश्रुती होईल. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उप आयुक्त ( आस्थापना ) गणेश चौधरी, उप मुख्य कार्यकारी ( सा ) चंद्रकांत पवार उपस्थित होते.
या प्रसंगी भीमनवार म्हणाले, आयुक्त यांनी केलेल्या सूचना लक्षात घेवून योग्य ती कार्यवाही केली जाईल. शिवाय जिल्ह्याच्या विकास कामाला गति मिळावी, सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. या आढावा बैठकीला प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा ) डी. वाय. जाधव, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी ) छायादेवी शिसोदे, प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एम. आडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मयूर हिंगणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एल. पवार तसेच इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.