प्रासंगिक लेख

ऐलमा पैलमा गणेशदेवा

    कालच आक्काच्या घरी कोल्हापूर, कसबा बावडा येथे काॅलनीत हादगा खेळायला मिळाला. २३-२४ वर्षांनंतर काल हादग्यात सहभागी झाले होते. गाणे म्हणून खिरापत ओळखणे, मग सर्वांची खिरापत वाटून घेऊन एकत्र बसून ती खाणे…हे सर्व करताना मन नकळत बालपणीच्या आठवणीत गेले. घरी आणि शाळेत हादगा(भोंडला) घालायचो, ते दिवस आठवले. सूर्याने हस्त नक्षत्रात प्रवेश केला की हा हादगा खेळला जातो. या दिवसांत परतीच्या पावसाला सुरूवात झालेली असते, शेतात नवे धान्य येऊ लागलेले असते. काही ठिकाणी याला भोंडलाही म्हणतात. सलग १६ दिवसांचा हा हादगा असतो.
     माझे बालपण कोल्हापूरच्या कागल या तालुक्याच्या गावी गेले. हादगा ४ दिवसांवर आला की, आम्हा मुलींची लगबग सुरू होई. अत्ताराच्या दुकानातून दोन हत्तींचे हादग्याचे चित्र आणण्यापासून सुरूवात. .मग ते चित्र एका भिंतीवर चिकटवायचे. यानंतर मात्र खरी धमाल, मस्ती असे. या चित्राला पहिली माळ १६ कच्ची फळे आणि फळ भाज्यांची घालण्याची प्रथा आहे. मग धांदल उडे ही फळे अन् भाज्या जमवायला. मग त्यासाठी सख्यांबरोबर दिवस दिवसभर एकमेकींच्या अंगणात, परसात तर कधी मैत्रिणींच्या शेतातसुध्दा जायचो. घरी न सांगता गेल्यामुळे परत आल्यावर आईचा ओरडा बसे ती गोष्ट वेगळीच. पण दिवसभर केलेल्या मस्तीच्या धुंदीत आणि हादग्याच्या तयारीत आईच्या ओरडण्याचे काहीच वाटत नसे. हादगा ज्या दिवशी सुरू होई त्या दिवशी ही फळे आणि फळ भाज्यांची माळ करून त्या हादग्याच्या चित्राला प्रथम घालून मग पाटावर खडू किंवा रांगोळीने हत्तीचे चित्र काढून त्याभोवती सार्‍या सख्या फेर धरून हादग्याचे पहिले गाणे म्हणायचो……
         “ऐलमा पैलमा गणेश देवा
            माझा खेळ मांडू दे
            करेन तुझी सेवा. ….”
     मग दिवस पुढे वाढत जातील तसे एक एक गाणे वाढवत जायचे. रोज फुलांचा हार आणि चिरमुरे, शेंगदाणे, हिरवे हरभरे, मक्याचे दाणे इत्यादींची  माळ करून या हादग्याच्या फोटोला घातली जायची….असे करत शेवटच्या दिवशी १६ गाणी म्हणायची.
 ‘जिलबी बिघडली’, ‘काळी चंद्रकला नेसू कशी’ ही गाणी तर आबांनी आम्हाला शिकवली होती आणि ती मी-आक्काने मुलींना म्हणायला शिकवली होती. रोजची गाणी झाली की, खिरापत ओळखायची. हे खूप कठीण काम असे. आई रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवे. कधी कधी तर मलाही तो माहीत नसे…आई आणि आक्कालाच माहिती असे…आमच्या घरची खिरापत कधीच कोणाला ओळखता येत नसे. १६व्या दिवशी आई, आक्का सर्व मैत्रिणींसाठी जेवण बनवायच्या आणि त्या दिवशी हादग्याचे बोळवण म्हणजेच विसर्जन करायचो.
     आमच्या शाळेतही प्रत्येक वर्गात हादगा पुजला जात असे. रोज शेवटचा तास हा हादगा खेळण्यासाठी राखीव ठेवलेला असे या दिवसांत. वर्गातील मुलांचा आमच्या खिरापतीवरच डोळा असे. शाळेच्या पटांगणावर शाळेतील सर्व मुली एकत्रच फेर धरून हादग्याची गाणी म्हणायचो. तो एक वेगळाच आनंदोत्सव वाटे. या निमित्ताने शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींच्या ओळखी होत असत. रूसवे-फुगवे, भांडण-अबोला गाणी म्हणताना, खिरापत ओळखताना विसरून जात असत आणि पुन्हा मैत्रीचा नवा प्रवास सुरू होई. असा हा हादगा आम्हा मुलींचा आनंदोत्सवच असे. लग्नाच्या आधी दरवर्षी हादगा पुजणारी मी लग्नानंतर ठाणे व नंतर नवी मुंबईत आल्यावर या उत्सवाला मुकले होते. कुठलेतरी महिला मंडळ या दिवसांत एखादा दिवस या हादग्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात पण त्याला आधीच्या हादग्याची गोडी नाही की सर नाही.
       आता या अस्सल मराठी मातीच्या प्रथा परंपरा लोप पावत चालल्या आहेत. मुंबई- ठाणे-पुण्यासारख्या शहरातील मुलींना माहितीच नाहीत. एखाद दुसरे सार्वजनिक मंडळ किंवा संस्था एक दिवस भोंडला साजरा करतात. परप्रांतीय गरबा, दांडिया नवरात्रीचे नऊ दिवस रात्री उशिरापर्यंत चालू असतात पण हादग्यासारख्या मराठी उत्सवाला धकाधकीचे-धावपळीचे जीवन त्यामुळे मागे पडला, अशी न पटणारी कारणे दिली जातात.  परप्रांतीयांचा गरबा, दांडिया आज आपल्या गावागावांत पोहोचला पण हादगा, भोंडला, भुलाबाई या सारखे सण सोहळे विस्मृतीत गेले आहेत. दुसर्‍या संस्कृतीतील सण आपलेसे करताना आपले सण आपण विसरू नयेत, याची आपणच काळजी घ्यायला हवी, हो  ना….??????
                 
 सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!