महाराष्ट्र मुंबई

सिडको महागृहनिर्माण योजनेतील १४ हजार ८३८ घरांची संगणकीय सोडत संपन्न

मुंबई, दि. 2 : सिडकोतर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेतील 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांची ऑनलाईन संगणकीय सोडत मंगळवार,दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी सिडको भवन, सातवा मजला,सिडको सभागृह येथे संपन्न झाली. या प्रसंगी योजनेच्या अर्जदारांनीदेखील मोठ्या प्रमाणावर हजेरी नोंदवली. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in वरून करण्यात आले होते. या थेट प्रक्षेपणालादेखील अर्जदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी  सिडकोचे, श्री. लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक 2, कु. प्रिया रातांबे,जनसंपर्क अधिकारी व श्री. निलेश चौधरी, व्यवस्थापक प्रणाली उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर सोडत पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली पार पडली. या समितीमध्ये निवृत्त (IAS) अधिकारी व माजी उपलोकायुक्त, महाराष्ट्र राज्य शासन, श्री. सुरेश कुमार,एनआयसी मुंबईचे श्री. मोईझ हुसेन व आयसीटी अधिकारी,म्हाडा श्रीमती. सविता बोडके यांचा समावेश होता.

सोडतीसाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर ‘मे. प्रॉबिटी सॉफ्ट’ यांच्यामार्फत सिडकोच्या आवश्यकतेनुसार विकसित करण्यात आले होते. संगणकीय सोडत काढताना अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच बीज क्रमांक म्हणून गृहित धरण्यात आला होता. प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या अर्जातून स्वतंत्रपणे योजना संकेत क्रमांक व आरक्षण प्रवर्ग क्रमांक निहाय जाहीर सोडत संगणकाद्वारे काढण्यात आली. परंतु जर प्रत्येक योजनेत अथवा प्रवर्गाकरिता उपलब्ध सदनिकांच्या संख्येपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले अथवा पहिल्या सोडतीनंतर सदनिका शिल्लक राहिल्यास ज्या अर्जदारांनी अर्ज भरतेवेळी ‘अन्य गृहनिर्माण योजनेतील रिक्त सदनिका देण्याबाबत आपला विचार व्हावा’ यासाठी संमती दिली असेल अशा अर्जदारांमधूनच सोडत काढण्यात आली.

सोडत प्रसंगी अनेक भाग्यवान विजेते हजर होते. त्यांचे या प्रसंगी अभिनंदन करण्यात आले. सोडतीचा निकाल सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in  https://lottery.cidcoindia.com वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यशस्वी अर्जदारांना सिडको महामंडळातर्फे सदनिका प्राप्त झाल्यासंदर्भातील एसएमएस पाठवण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत सर्व सदनिकांचे काम प्रगती पथावर आहे. सदनिकांचा ताबा तीन टप्प्यांत देण्यात येणार असून तो अनुक्रमे ऑक्टोबर 2020, डिसेंबर 2020 व मार्च 2021 असा प्रस्तावित आहे. भविष्यात सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास त्या www.cidco.maharashtra.gov.in  https://lottery.cidcoindia.com या संकेस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. जे अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरतील ते वगळून, उर्वरित अर्जदारांनी भरलेली अनामत रक्कम त्यांच्या अर्जातील नमूद बॅंक खात्यामध्ये सोडतीच्या दिनांकापासून 15 दिवसांत परस्पर जमा केली जाईल. त्याचप्रमाणे यशस्वी अर्जदारांना सदनिकांसाठी सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सिडकोमार्फत येत्या काळात मार्गदर्शकपर बॅंकींगसंदर्भातील परिसंवादाचे आयोजन करणे प्रस्तावित आहे.

सदर योजनेतील एकूण 14 हजार 838 घरांपैकी 5 हजार 262 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आहेत. तर 9 हजार 576 सदनिका अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी आहेत. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 11 ठिकाणी ही गृहनिर्माण योजना साकार होत आहेत.

सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेत तळोजा येथील सेक्टर 27 मध्ये आसावरी गृहसंकुल, सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुल, सेक्टर 22 मध्ये मारवा गृहसंकुल, सेक्टर 29 मध्ये धनश्री गृहसंकुल, खारघर येथील सेक्टर 40 मध्ये बागेश्री गृहसंकुल, कळंबोली येथील सेक्टर 15 मध्ये हंसध्वनी गृहसंकुल, घणसोली येथील सेक्टर 10 मधील भूखंड क्र. 1 वर मालकंस गृहसंकुल, भूखंड क्र. 2 वर मेघमल्हार गृहसंकुल, द्रोणागिरी येथील सेक्टर 11 मध्ये मल्हार गृहसंकुल, सेक्टर 12 मधील भूखंड क्र. 63 वर भूपाळी गृहसंकुल व भूखंड क्र. 68 वर भैरवी ही गृहसंकुले साकारण्यात येत आहेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 25.81 चौ.मी. आहे तर अल्प उत्पन्न गटांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 29.82 चौ.मी. आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे 2 हजार 862 सदनिका, खारघर येथे 684 सदनिका, कळंबोली येथे 324 सदनिका, घणसोली येथे 528 सदनिका व द्रोणागिरी येथे 864 सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी तळोजा येथे 5 हजार 232, खारघर येथे 1 हजार 260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 व द्रोणागिरी येथे 1 हजार 548 सदनिका उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घर प्राप्त झाल्यास एकूण 2.5 लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे तर सी.एल.एस.एस. च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील घर प्राप्त होणाऱ्या लाभार्थ्यांना रू. 2.67 लाख व्याज अनुदान प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे आणखीन 25 हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेसंदर्भातील निविदा प्रक्रीया सुरू आहे. सदर निविदा प्रक्रीया पूर्ण करून या वर्षाअखेरीपर्यंत ही गृहनिर्माण योजना सिडकोतर्फे जाहीर करणे प्रस्तावित आहे. या गृहनिर्माण योजनेतदेखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प अत्पन्न घटकांसाठी सदनिका उपलब्ध असतील.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!