ग्रामीण गृह निर्माण अभियंता, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा जिल्हा परिषदेने केला गौरव
ठाणे दि ९ : शासनाची महत्वाकांक्षी असणारी प्रधानमंत्री आवास योजना ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात यशस्वीरीत्या राबविण्याकरिता सन २०१८- १९ चे दिशादर्शक नियोजन करण्यात आले असून या वर्षाचे ४६२ घरकुलांचे उद्दिष्ट डिसेंबर अखेर पूर्ण होईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. ते कार्यक्रमा दरम्यान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते , कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी हणमंतराव दोडके उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात प्रधानमंत्री आवस योजना (ग्रामीण) या योजनेत ठाणे जिल्ह्याने उत्तम कामगिरी करत राज्यात अव्वल येण्याचा मान मिळवला. त्या निमित्ताने या योजनेशी निगडीत असणारे ग्रामसेवेक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण गृह निर्माण अभियंता आणि इतर अधिकारी- कर्मचारी यांना भीमनवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी ग्रामसेवकांच्या अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात संपन्न झाला.
उपस्थितांशी संवाद साधताना भीमनवार म्हणाले, सरकारी नोकरीत कौतुकाचे क्षण कमी येत असले तरी तुम्हाला आव्हानात्मक वाटणाऱ्या कामांकडे संधी म्हणून पाहिल्यावर तुम्हाला दिलेले लक्ष साध्य कराल आणि तुमचे कौतुक होत राहील. कोणतीही योजना एकट्याने नियोजन करून यशस्वी होत नाही त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. आगामी काळात प्रधानमंत्री आवास योजने प्रमाणे शासनाच्या सर्व महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रस्थानी येण्याकरिता सर्वांनी मिळून कामाचे नियोजन करायला हवे. या सत्काराला उत्तर देताना प्रातिनिधीक स्वरुपात ग्रामसेवकांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
तत्पूर्वी सातपुते यांनी ग्रामपंचायत निहाय कामांचा आढावा घेवून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच बनसोडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. या गौरव समारंभासाठी सत्कारमूर्ती आपल्या कुटुंबां समवेत उपस्थित होते.