मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्या महिलेला अटक करण्यात आले आहे. महिलेने मंगळसूत्र खेचून ट्रॅकवर उडी मारून पळ काढला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी चोरट्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कुर्ला परिसरात राहणारी 35 वर्षीय महिला 13 ऑक्टोबर 2018 रोजी लोकलने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान लोकल विक्रोळी स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर थांबली असता सीता सोनवाणी (25) हिने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले असता मंगळसूत्र तुटून सोन्याचा तुकडा तिच्या हातात आला. सोन्याचा तुकडा घेऊन सीताने रेल्वे रूळावर उडी मारून पळ काढला.
या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 4269/18) भादंवि कलम 379, 356 नुसार गुन्हा दाखल केला. विक्रोळी स्थानकातील सीसीटूव्ही फुटेजच्या साहाय्याने कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी सीता सोनवाणीच्या मुसक्या आवळल्या. तिने चोरलेला मंगळसूत्राचा तुकडा पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्हा लोहमार्ग मध्य / पश्चिम परिमंडळचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छींद्र चव्हाण, कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक संकपाळ, हवालदार (बक्कल नं. 527) खरात, पवार (बक्कल नं 1083), घोडके (बक्कल नं. 1696), ऐवळे (बक्कल नं. 1559), पोलीस शिपाई (बक्कल नं. 18) शिंदे, शेख (बक्कल नं. 1198), महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. 3001) खरमाटे आदी पोलीस पथकाने उघडकीस आणला.