ठाणे : समाजातील दिव्यांग घटकाला सक्षम बनवण्यासाठी समाजाने त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांनी तयार केलेला कलाकृतीचा गौरव व्हायला हवा.असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी केले. समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती निखिल बरोरा, महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना करसन ठाकरे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी) छायादेवी सिसोदे , समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंजुषा जाधव यांनी संपूर्ण स्टाॅलला भेट देवून प्रत्येकाशी संवाद साधला. शिवाय संस्थाचे कामकाज समजून घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले. ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भरलेले हे प्रदर्शन ३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुरु राहणार असून या प्रदर्शनात जिल्ह्यातील दिव्यांग शाळा तसेच दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थां सहभागी झाल्या आहेत. सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वेळेत नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात दिव्यांग विद्यार्थांनी बनवलेले आकर्षक कंदील, दिवे, पणती, तोरण, मेणबत्ती, उटणे, दिवाळी फराळ, पेपर बॅॅग, हात रुमाल, चॉकलेटस, आर्टीफिशल ज्वेलरी, किचन नॅपकीन, मसाले, गिफ्ट एन्व्हलप, रंगीत कागदी फुलांचे बुके आणि इतर गृहपयोगी वस्तू खरेदी करता येणार आहे.