भारत

‘मेक इन इंडिया’द्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचा प्रयत्न – संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

के – ९ वज्र, एम-७७७ होवित्झर अत्याधुनिक तोफ तसेच ‘कॉमन गन टाेवर’ देशाला समर्पित

नाशिक, दि. 9 : ‘मेक इन इंडिया’द्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून या माध्यमातून सैन्य दलातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.

स्कुल ऑफ आर्टीलरी देवळालीच्या फायरिंग रेंज येथे श्रीमती सीतारामन यांच्या हस्ते के – 9 वज्र आणि एम-777 होवित्झर या अत्याधुनिक तोफा तसेच कॉमन गन टाेवर देशाला समर्पित आणि सैन्य दलाच्या सुपुर्द करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, सेना प्रमुख जनरल बिपीन रावत, आर्टीलरीचे महासंचालक पी.के.श्रीवास्तव आदीउपस्थित होते.

श्रीमती सीतारामन म्हणाल्या, एकाचवेळी दोन अत्याधुनिक तोफा भारतीय सेनेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहे. 25 होवित्झर तोफा अमेरिकेकडून तयार करून घेण्यात आल्या असून उर्वरित 120 तोफांची निर्मिती भारतात करण्यात येणार आहे. दुर्गम भागात आणि रस्त्यांची सुविधा नसलेल्या युद्धभूमीवर या तोफा उपयुक्त ठरतील.

दक्षिण कोरियाकडूनन 10 के-9 वज्र तोफा घेण्यात आल्या असून त्यांची जुळणी भारतात करण्यात आली आहे. उर्वरित 90 तोफांचे उत्पादन पूर्णत: भारतात करण्यात येईल. या तोफा संपुर्णपणे स्वयंचलित आहेत. कॉमन गन टाेवरचे उत्पादनही देशातच होणार आहे. या तिन्हींच्या समावेशामुळे नवभारतासाठी आवश्यक सक्षम तोफखाना दल निर्माण करण्यात मदत होईल. या प्रक्रियेसाठी कालावधी अपेक्षित असला तरी भारतीय सेना ही प्रक्रिया वेगाने पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, सैन्य दलाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेसाठी कालावधी देशासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. कोणत्याही देशाच्या सुरक्षेसाठी तोफखाना दल अत्यंत महत्त्वाचे असते. या दोन तोफांच्या समावेशाने संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील सिद्धतेसोबत‘मेक इन इंडिया’ प्रक्रियेला चालना मिळेल.

संरक्षण उत्पादने देशात तयार केल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग वाढेल. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरे जात भारतीय उद्योग क्षेत्र संरक्षण उत्पादनात स्वयंपुर्णत:गाठण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी भारतीय तोफखाना दलाच्या क्षमतेचे प्रदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. कार्यक्रमानंतर श्रीमती सीतारामन यांनी वीरमाता आणि वीरपत्नींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

भारतीय सेनेत दाखल झालेल्या अल्ट्रा लाईट होवित्झर तोफा वेगवान हालचालींसाठी उपयुक्त असून त्यांची मारक क्षमता 31 किलोमीटरपर्यंत आहे. के-9 वज्र स्वयंचलित तोफा 38किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. आधुनिक प्रकारच्या युद्धासाठी या तोफा अत्यंत उपयुक्त आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!