महाराष्ट्र

शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नांदुरी येथे अटल ग्रामीण आरोग्य शिबिराचा शुभारंभ 

नाशिक, दि.2 : अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि  दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नांदुरी येथे आयोजित अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर,बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे,जे.पी.गावीत, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, डॉ. रागिणी पारेख, डॉ.अजय चंदनवाले, डॉ. एम. डी. तावडे, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,वैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारचे संशोधन होत आहे. अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा खर्च अधिक असल्याने सामान्य माणूस रोगाचे निदान झाले तरी उपचारापासून दूर राहतो,बऱ्याचदा यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. याबाबत राज्य शासनाने आपली जबाबदारी स्वीकारुन गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ‘आयुष्यमान भारत’योजनेच्या रुपाने सुरु केली. या योजनेंतर्गत देशातील 50 कोटी जनतेला पाच लाखापर्यंतचे उपचार करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे.

राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतात. दोन्ही योजनांमध्ये उपचार शक्य नसल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपचार करण्यात येत आहे. कुठलीही उपचार पद्धती आणि सर्व प्रकारच्या उपचाराची सुविधा शासनाने दिली आहे. अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्यात आरोग्यसेवेची नवी संस्कृती पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने रुजली असल्याचे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. अनेक नामवंत डॉक्टर्स समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा भावनेने शिबीरात कार्य करतात,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

आदिवासी बांधवाना वनजमीन पट्टे देण्याचे काम वेगाने सुरु असल्याचे सांगून जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले. दुष्काळात शासन जनतेच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री. फडणवीस यांच्या हस्ते जनजाती गौरव यात्रेचा शुभारंभ आणि लघुपटाचे उदघाटन करण्यात आले. या यात्रेद्वारे शासनाच्या योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहोचतील व या समाजातील थोर व्यक्तींचा आदर्श नव्या पिढीसमोर जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले,दुर्गम भागातील आदिवासी बांधवापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरासाठी उद्योग संस्था आणि सेवाभावी संस्था यांचे सहकार्य लाभले आहे. शिबीराच्या माध्यमातून साडेतीन लाख लोकांपर्यंत डॉक्टर्स पोहोचले आहेत. गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषधोपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सामान्य जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यात येत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांसाठी निधी देण्यात आल्याचे ते म्हणाले.

डॉ. लहाने म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील हे 27 वे  मोठे शिबीर असून आतापर्यंत 27 लाख रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. 2 लाख 67हजार रुग्णांची शस्त्रक्रिया, 20 हजार ह्रदय शस्त्रक्रिया व 12 हजार बायपास सर्जरी शिबीराच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत750 कोटी रुपयांचा निधी आरोग्य सेवेसाठी देण्यात आला आहे.

प्रास्ताविकात डॉ. आहेर यांनी शिबीर आयोजनाची माहिती दिली. आदिवासी बहुल दिंडोरी, देवळा,बागलाण, सुरगाणा व कळवण तालुक्यात आरोग्य सुविधा देण्यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या शिबीरात सर्व पॅथीचे उपचार करण्यात येणार असून रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिबिराच्या आयोजनाबद्दल डॉ. आहेर यांनी मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री यांना धन्यवाद दिले.

मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा केल्याबद्दल उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे नांदूरी येथे स्वागत

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे साकोरे पाडा हेलीपॅड येथे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, देवयानी फरांदे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, कळवण उपविभागीय अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते,

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!