डोंबिवली :- ( शंकर जाधव )आगरी समाज फक्त भांडत असतो असा सर्वसाधारण समज आहे. पण अस नसून समाजामध्ये माणुसकी आणि जिव्हाळा ठासून भरला आहे. समाज जागरूक आहे चिंता करण्याचे कारण नाही. विकासाच्या नावावर समाजाला वेठीस धरले जात असेल तर त्याचा मोबदला समाजाला मिळालाच पाहिजे. २७ गावांचा प्रश्नही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस त्या २७ गावांच्या निर्णयाबाबत सकारात्मक आहेत असे प्रतिपादन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी डोंबिवलीत केले. आगरी युथ फोरम आयोजित १६ व्या आगरी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शंकर काका भोईर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, नंदू म्हात्रे , फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, शरद पाटील, पांडुरंग म्हात्रे रामकृष्ण पाटील, वसंत पाटील, आदि उपस्थित होते.
यावेळी पाटील पुढे म्हणाले, जो पर्यंत आगरी समाज आहे तो पर्यंत आगरी महोत्सव झालेच पाहिजेत. आगरी युथ फोरमचे कौतुक करीत त्यांनी सांगितले कि, चिंता करू नका लोकांना वाटते कि गुलाबाला काटे आहेत. पण काट्यामध्येच गुलाब आहे. कोणतीही गोष्ट सकारात्मक घ्या. आपल्याकडे कोणाचे लक्ष नसेल तर आपण मागे पडतोय असं समजा. पण ज्याच्याकडे लक्ष जात तेच कामाचे असतात. आपण काम करत रहा कोण बरोबर आहे, कोण नाही याचा विचार करू नका. जो काम करतो त्याच्याच चुका होतात. समाज श्रीमंत आहे, पण आपल्याकडे उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. ज्या वेळेस समाज वैचारिक श्रीमंत होईल तेव्हा समाज श्रीमंत होईल तोपर्यत समाज श्रीमंत आहे हे मान्य करणार नाही. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार नरेंद्र पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना गुलाब वझे यांनी केली तर सूत्रसंचालनाची जबाबदारी शरद पाटील यांनी सांभाळली.