ठाणे

आता राज्यातील कुठल्याही शिधावाटप दुकानातून धान्य मिळणार… -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले जाहीर

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) आजवर शिधाधारक ज्या शहरात राहतो त्या शहरातील शिधावाटप दुकानातूनच धान्य मिळत होते.मात्र आता भाजप सरकारच्या पारदर्शक कामामुळे राज्यातील कुठल्याही शिधावाटप दुकानातून धान्य मिळणार असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत जाहीर केले. डोंबिवली पश्चिमेकडील स्थलांतरीत शिधावाटप कार्यालयाच्या रविवारी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

       पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयाचे स्थलांतर रेल्वे स्थानक नजीकच्या जुन्या विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या तळमजल्यावर करण्यात आले त्या कार्यालयाचे उदघाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी केडीएमसीच्या महापौर विनिता राणो, ठाणे विभागातील उपनियंत्रक अधिकारी नरेश वंजारी, धनराज जाधव, `ह` प्रभाग अध्यक्षा वृषाली जोशी, परिवहनचे माजी सभापती संजय पावशे, स्थानिक नगरसेविका विद्या म्हात्रे, संदीप पुराणीक, राजन सामंत, भाजप जिल्हा सरचिटणीस  शशिकांत कांबळे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार देशातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत तसेच व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचविल्या जात असून सरकाच्या पारदर्शक कारभारामुळे योजनांमधील भ्रष्टाचाराला ब्रेक लागला आहे. असे पारदर्शक सरकार याआधी झालेले नाही गेल्या काही दिवसांपासून ई-पॉज मशीनच्या माध्यमातून सरकारने धान्य देण्याची प्रक्रिया सुरु  केली आहे. ज्याला कोणाला धान्य घ्यायचे असेल त्याच्या थम इम्प्रेशन शिवाय धान्य घेता येणार नाही. त्यामुळे धान्याच्या काळाबाजाराला ब्रेक लागला आहे. रेशन दुकानदारांचीही  सरकारने दखल घेतली आहे त्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. शहरातील दुकानांचे भाडे लक्षात घेता त्यांना त्याच दुकानामध्ये काय वेगळा व्यवसाय करता येईल का ? यासाठी ही सरकारकडून  प्रयत्न करण्यात आला आहे.गेल्या अधिवेशनाच्या काळापासून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आयोडीन युक्त आणि लोह युक्त असे मीठ १४रूपये किलो दराने रेशनिंगवर दयायला सुरुवात केली आहे. यात दिड रूपयांर्पयतचे कमिशन दुकानदाराला मिळणार आहे. आधीच्या सरकारच्या काळात ३९` फ` परिक्षेत्रतील व्यक्तीला त्याच ठिकाणी रेशनीग घेणे बंधनकारक होते. मात्र आता तशी गरज नाही. तुम्ही तुमचे रेशनिंगचे कार्ड दाखविले तर थम इम्प्रेशनच्या माध्यमातून तुमच्या गावातील रेशनिंगच्या ठिकाणीही धान्य तुम्हाला मिळु शकते. यावरून भाजपा सरकार किती गतिमान आहे याची प्रचिती येते, असे चव्हाण म्हणाले. जून्या कार्यालयाच्या दुरवस्थेमुळे ड्रेनेजच्या पाण्यात काम करण्याची नामुष्की येथील कर्मचाऱ्यांवर ओढावत असल्याचे चित्र सातत्याने निदर्शनास यायचे. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक करणो आवश्यक आहे. कारण गेली अनेक वर्षे ते सर्व जीवावर बेतलेल्या अवस्थेत काम करीत होते. मात्र कोणीही कामात दिरंगाई केली नाही. दर पावसात मी केंद्राला भेट दयायचो त्यावेळी ही मंडळी गुडगाभर पाण्यात काम करताना दिसायची. त्यांच्या या कामाबद्दल राज्यमंत्री चव्हाण यांनी आभार मानले.

टोल फ्री नंबरवर तक्रार करा

    शिधावाटप संदर्भात कोणाला तक्रार करायची असेलतर १८००२२४९५० या टोल फ्री नंबरवर तक्रारी मांडण्यात याव्यात असे आवाहन राज्यमंत्री चव्हाण यांनी केले. या तक्रारी अन्न व नागरी सुरक्षा मंत्री गिरीश बापट व अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश फाटक यांच्या पोर्टल वर कळविल्या जातात. आपण तक्रार करत नाही आपण केवळ चर्चा करतो.याटोल फ्री वर तक्रार केली, तर सात दिवसात तक्रार निवारण करण्याची तरतुद  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!