ठाणे

टोरँट विरोधात एकवटले सर्वपक्षीय नेते

ठाणे : कळवा, मुंब्रा,दिवा परिसरात वीज वितरण व्यवस्थेच्या होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. ज्या टोरँट पॉवर कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय रद्द करण्याची घोषणा चार दिवसात शासनाने न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सर्व पक्षीय नेत्यांची ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात एक महत्वपूर्ण बैठक झाली असून या बैठकीमध्ये या कंपनीला एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, भाजपचे आमदार किसन कथोरे, शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक राजन किणे, उमेश पाटील, दशरथ पाटील, बाबाजी पाटील, धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि इतर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वादग्रस्त कंपनीला पाय ठेऊ देणार नाही असा इशारा देत गुरुवारपर्यंत जर शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय न आल्यास महावितरणच्या कार्यालयावर लाखोंचा मोर्चा आणला जाईल अशी माहिती ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी दिली आहे. मुंब्रा विभागामध्ये अंदाजे 84 हजार, दिवा-शिळ, देसाई विभागात 56 हजार आणि कळवा विभागात सुमारे 60 हजार ग्राहक संख्या असून या विभागातील नागरिक खाजगीकरण होणार असल्याने संभ्रमात आहेत. तसेच अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. टोरंट पॉवर कंपनीचा भिवंडी येथील महावितरणच्या कामाचा अनुभव चांगला नसून भिवंडी परिसरामध्ये टोरंट पॉवर कंपनी विरोधात नागरिकांची प्रचंड असंतोष आहे. महावितरणच्या वतीने भिवंडीच्या धर्तीवर कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही वीजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणच्या या निर्णयाला यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,आणि इतर पक्षांनी आपला विरोध दर्शवला आहे. आमदार सुभाष भोईर यांनी जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येत असलेल्या दिवा, शिळ, देसाई आणि मुंब्रा-कळवा परिसरामध्ये विद्युतवितरण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्यासाठी शासनाने टोरंट पॉवर कंपनीला ठेका देण्यास यापूर्वीच विरोध केला आहे. आ.भोईर यांनी टोरँट पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट तातडीने रद्द करण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.कळवा, मुंब्य्रातच नाही तर संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही तर वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. तर शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी देखील या कंपनीच्या विरोधात ऊर्जामंत्र्यांना पत्र दिले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!