महाराष्ट्र

शहीद जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप ….शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा : अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम.. या देशभक्तीचे स्फुलिंग उत्तेजित करणाऱ्या घोषणांनी मलकापूरचे आसमंत निनादून गेले. जम्मू व काश्मीर राज्यातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मलकापूर येथील संजय राजपूत व गोवर्धन नगर ता. लोणार येथील नितीन राठोड जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज 16 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मलकापूर येथे जनता कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात शहीद जवान संजय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौथाऱ्यावर शहीद जवान संजय यांचे सुपूत्र जय याने मुखाग्नी दिला. तसेच छोटा मुलगा शुभम यावेळी उपस्थित होता. यावेळी हजारो उपस्थितांनी साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार श्रीमती रक्षा खडसे, जि.प अध्यक्षा उमा तायडे, मध्यप्रदेशातील खंडवा येथील खासदार नंदकुमार चव्हाण, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार ॲड. आकाश फुंडकर, बुलडाणा कृउबासचे सभापती जालींधर बुधवत, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्ष हरीष रावळ, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आयजीपी आशुतोष कुमार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. केंजळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान संजय राजपूत यांच्याय कुटूंबियांशी यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांत्वन केले व शासनाने जाहीर केलेल्या 50 लक्ष रूपये आर्थिक मदतीचा धनादेश कुटूंबियांना दिला.

सुरूवातीला औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने शहीद संजय यांचे पार्थिव आणण्यात आले.  त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर मलकापूर शहरातून फुलांनी सजविलेल्या वाहनातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मलकापूर शहरात  गर्दीने उच्चंक केला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी , फुलांच्या पाकळ्यांनी  मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले.  भावूक वातावरणात रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या नागरिकांनी फुले वाहून श्रद्धांजली वाहली.

अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी,  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शहीद जवान नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान नितीन राठोड अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम..  या घोषणांनी गोवर्धन नगरचे वातावरण देशभक्तीमय झाले. जम्मू व काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोधर्वन नगर, ता. लोणार येथील नितीन शिवाजी राठोड जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज १६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या मूळ गावी गोवर्धन नगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती वंदना शिवाजी राठोड वय 30 वर्ष, मुलगा चि. जीवन वय 10 वर्ष व मुलगी कु. जिविका वय 5 वर्ष, आई सौ.सावित्रीबाई वय 53 वर्ष, वडील शिवाजी रामू राठोड वय 58 वर्ष, दोन बहीण आणि एक भाऊ प्रविण राठोड वय 32 वर्ष असा परिवार आहे.

गोवर्धन नगर येथील आश्रम शाळेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीवराव पाटील – निलंगेकर, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ.शशिकांत खेडेकर, डॉ.संजय रायमूलकर, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जि.प. सभापती श्वेताताई महाले, सिं.राजा शहराचे नगराध्यक्ष नाझेर काझी, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदींनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लक्ष रूपये आर्थिक मदतीचा धनादेश कुटुंबियांना सुपुर्द केला. शहीद जवान यांना केंद्रीय राखीव पोलीस दल व पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आदरांजली दिली.

शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव आज विशेष विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. औरंगाबाद येथून रस्ता मार्गे त्यांच्या मूळ गावी आणून गावातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संपूर्ण गाव यावेळी शोकाकूल झाले होते. गावकऱ्यांनी भावूक वातावरणात साश्रूनयनांनी शहीद नितीन राठोड यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!