भारत

पद्मभूषण राम सुतार यांनी देशाचा गौरव वाढविला : पंतप्रधान मोदी

श्री सुतार यांना टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 18 : जगातील सर्वात उंच असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारून प्रसिध्द शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी भारत देशाचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री. राम सुतार यांचा गौरव केला.

शिल्पकलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज प्रतिष्ठेचा ‘टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कार्यातून भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली. श्री. सुतार यांनी सरदार पटेलांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारून पटेलांचा एकतेचा संदेश जगभर पोहचविला आहे. त्यांच्या कार्याच्यामाध्यमातून भारत देशाचा गौरव वाढला आहे. ज्या गुरुदेव रविंद्रनाथ टागौर यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांनी आपल्या साहित्य व कलेच्या योगदानातून भारतीयांमध्ये जनगनमनची भावना जागवली, तर सदरदार पटेलांनी गुरुदेवांच्या याच विचारांना बळकटी दिली त्यामुळे पद्मभूषण राम सुतार हे गुरुदेव रविंद्रनाथ टागौर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना जोडणारा सेतू असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

अजुनही काम करायचे आहे : पद्मभूषण राम सुतार

वर्ष 1947 पासून शिल्पकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत असंख्य शिल्प, पुतळे उभारले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 522 फुट उंच पुतळा उभारला असून हा जगातील सर्वात मोठा पुतळा ठरला आहे. यामुळे भारत देशाची मान जगात उंचावली आहे त्याचा आपणास अभिमान असल्याचे श्री. सुतार यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. यापुढे अजूनही भरपूर काम करायचे असल्याच्या भावना श्री. सुतार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी, येथील प्रवासी भारतीय केंद्रात राष्ट्रपतींच्या हस्ते आज टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यावेळी उपस्थित होते. यावेळी वर्ष 2016 चा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार पद्मभूषण राम सुतार यांना प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात 2014 चा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार प्रसिध्द मनिपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह आणि 2015 साठी बांग्लादेशातील छायानट या सांस्कृतिक केंद्राला प्रदान करण्यात आला. 1 कोटी रूपये मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पद्मभूषण राम सुतार यांच्या कला क्षेत्रातील योगदानाची दखल

मुळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्हयातील गोदूर या छोटयाशा गावात जन्मलेले पद्मभूषण राम सुतार यांनी शिल्पकलेत दिलेल्या बहुमूल्य योगदानाची दखल घेवून त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. शिल्पकलेतील 40 वर्षांच्या कारकिर्दीत श्री सुतार यांनी 50 पेक्षा अधिक भव्य शिल्प साकारले आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच श्री. सुतार यांनी जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ लेण्यांतील प्राचीन शिल्पांच्या जीर्णोध्दाराच्या कामात मोलाचे योगदान दिले आहे. मध्य प्रदेशातील गांधीसागर धरणातील 45 फुटाचे भव्य चंबळ स्मारक हे त्यांच्या कार्याची महानता पटवून देणारे पहिले शिल्प ठरले. चंबळ आणि तिच्या दोन मुलांची ही भव्य मूर्ती म्हणजे मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातील बंधुभावाचे प्रतीक ठरली. येथूनच भारतासह जगाला श्री. सुतार यांच्या कार्याची ओळख झाली.

संसद परिसरातील महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज आदींसह 600 पेक्षा जास्त शिल्प श्री. सुतार यांनी आतापर्यंत साकारले आहेत. शिल्पकलेचे जतन व या कलेचा प्रचार-प्रसार करण्यात श्री. सुतार यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिध्द सितार वादक पंडित रवि शंकर यांना वर्ष 2012 चा पहिला टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार जाहीर झाला होता. तर वर्ष 2013 मध्ये प्रसिध्द संगीतकार जुबीन मेहता यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!