ठाणे

ठाणे मनपाची २०१८-१९ या वर्षात ५१८.६१ कोटी विक्रमी मालमत्ता कर वसुली

ठाणे :  प्रतिनिधि (संतोष पडवळ ) – ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विविध उपाययॊजनांच्या माध्यमातून कर वसुली राबविल्यामुळे महापालिकेच्यावतीने सन २०१८ -१९ या आर्थिक वर्षात सुमारे ५१८.६१ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे. सन २०१७- १८ च्या रुपये ४४६.४१ कोटी वसुलीच्या तुलनेत यावर्षी ५१८.६१ कोटी रुपये म्हणजेच एकूण १७ टक्के वाढ झाली आहे.दरम्यान यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच मालमत्ता कर आणि पाणी कर वसुलीला प्राधान्य देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज आढावा बैठकीत दिले.

ठाणे महानगरपालिकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुधारित अंदाजपत्रकामधील एकूण ५५७ कोटी इतका सुधारित इष्टांगापैकी आज अखेर ५१८.६१ कोटी इतकी वसुली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्याने आर्थिक शिस्त आणि उत्पन्न वाढीला प्राधान्य दिल्यामुळे यंदा मालमत्ता कर वसुलीत विक्रमी वाढ झाली आहे.

दरम्यान सन २०१६-१७ साली ३८० कोटी, सन २०१७ -१८ साली ४४६.४१ कोटी आणि सन २०१८-१९ साली एकूण ५१८.६१ कोटी रूपयांची वसुली करण्यात आली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ७२.२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सन २०१८ -१९ या आर्थिक वर्षामध्ये नविन मालमत्तावर सुमारे रु.६२ कोटी इतकी मालमत्ता कर आकारणी झाली आहे.या आर्थिक वर्षात मालमत्ता करासाठी नविन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, या संगणक प्रणालीमधून ऑनलाईन पध्दतीने सुमारे ५१२३६ इतक्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता रु.५१.२१ कोटी इतका कर भरला आहे.

पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाही रक्कम भरल्यास, दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेवर सूट,सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा २०३२७५ इतक्या मालमत्ताधाकरांनी लाभ घेतला आहे.

या आर्थिक वर्षात प्रभाग समितीनिहाय झालेल्या वसुलीमध्ये उथळसर प्रभाग समिती ३५.५३ ,नौपाडा-कोपरी प्रभाग समिती ७६.४९ ,कळवा प्रभाग समिती २५.५०,मुंब्रा प्रभाग समिती २०.४३, दिवा प्रभाग समिती ३७.७९ , वागळेप्रभाग समिती २०.६९, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती २४.५४, वर्तकनगर प्रभाग समिती ७२.४५, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती १३०.८४ आणि महापालिका मुख्यालय ७४.३६ कोटी अशी एकूण ५१८.६१ कोटीची वसुली करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने या आर्थिक वर्षात कर निर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.यामध्ये कस्टमाईज्ड सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. करदात्यांना आपला कर निर्धारण तपशील पाहणे, डाऊनलोड व कर प्रदान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असून करदात्यांना एसएमएसद्वारे कर रक्कम जमा झाल्याची खात्री करून ईमेलव्दारे पावती उपलब्ध करण्याचीही सुविधा कार्यान्वित आहे.तसेच डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,पीओएस मशीनद्वारे विनाशुल्क कर संकलन सुविधा महापालिकेच्या २० कर संकलन केंद्राबरोबरच मोबाईल व्हॅनद्वारे देखील नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.या सर्व योजनांमुळे यंदा महापालिकेच्या कर वसुलीत विक्रमी वाढ झाली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!