खरीप हंगाम 2019; 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन

ठाणे :  सन 2019 च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले असून या हंगामात 1 लक्ष 57 हजार 949 मे. टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरीप नियोजन बैठकीत ही माहिती देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  अंकुश माने, जिल्हा अग्रणी बॅंकेचे समन्वयक जे.एन. भारती, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे,  कल्याणचे उपविभागीय कृषी अधिकारी जे.एस. बोडके, महाबीजचे  पुणे विभागीय व्यव्स्थापक अरविंद सोनोने,  उप विभागीय व्यव्स्थापक  एस. एम. तेलंगेपाटील, कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र मर्दाने, जिल्हा मृदा संधारण अधिकारी श्रीमती टी.आर. झंजे वाघमोडे,  नाबार्डचे किशोर पडघान, तसेच तालुका कृषी अधिकारी व अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी 2018 च्या खरीप हंगामाचा आढावा व 2019 चे नियोजन सादर केले. त्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली की, सन 2018 मध्ये 58 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर  पेरणी होऊन 1 लक्ष 44 हजार 229 मेट्रिक टन  उत्पादन झाले. जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या भात पिकाची उत्पादकता 2553 किलो प्रति हेक्टर इतकी होती. या शिवाय नागलीचे पिक हे 805 किलो प्रति हेक्टर इतके आले.

सन 2019 साठी जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून  1 लक्ष 57 हजार 949 मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. या हंगामासाठी प्रामुख्याने भात पिकासाठी 59 हजार 279 हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून  2578 किलो प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्षांक निश्चित केला आहे. यासाठी जिल्ह्याला 10 हजार 670 क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे  तर 14 हजार 280 मेट्रीक टन खतांचे आवंटन प्राप्त झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. याशिवाय 2260 हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.  तर 1210 हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, 880 हेक्टरवर उडीद, 190 हेक्टरवर मुग, 1320 हेक्टरवर तूर, 237 हेक्टरवर गळीत धान्य पिके, 533 हेक्टरवर इतर कडधान्य  असे पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गत खरीप हंगामात प्रत्यक्षात 58869 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.

भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारीय बियाण्यांचा वापर, लागवड पद्धतीत बदल तसेच कडधान्य उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!