कल्याण : बँक लुटण्यासाठी आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या कल्याण पोलिसांच्या अँटी रॉबरी स्कॉडने आवळल्या असून मुख्य गुन्हेगारासह 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींवर महाराष्ट्रातील विविविध जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात तब्बल 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सर्वजण दक्षिण भारतात राहणारे आहेत.

या आरोपींवर महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नागपूर, गोंदिया आणि कर्नाटक राज्यात 50 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचेही उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 15 ते 20 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
तर ही सर्व टोळी टकटक गॅंग म्हणून कुपरिचित होती. अंगावर घाण किंवा खाजखूजली टाकून किंवा छोट्या बेचकीच्या आधारे कारची काच फोडून गाडीतील रोकड लुटायची अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात दरोडेखोरांना पकडण्यात आले असून ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॉबरी स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दीपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, पोलीस नाईक भावसार, रवींद्र हासे, शिपाई चिंतामण कातकडे, सुनील गावित आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत कल्याणचे एसीपी सुनिल पोवार यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते.