ठाणे

डोंबिवलीतून बेपत्ता झालेल्या तरुणीचे गूढ कायम…. नातेवाईकांसह पोलिसही चक्रावले

डोंबिवली : ( शंकर जाधव )  खाली जाऊन येते असे आईला सांगून घराबाहेर पडलेल्या बेपत्ता तरुणीचे गूढ 24 तासानंतरही कायम आहे. अद्याप ही तरुणी हाती लागली नसल्याने पोलिसांसह तिच्या घरचेही चिंताग्रस्त झाले आहेत.
शीतल रामजी भानुशाली (25) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असून ही तरूणी डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगाव परिसरातील शंकेश्वर नगर इमारतीत राहते. आई-वडीलांसह राहणाऱ्या या तरूणीवर जानेवारीपासून डॉ. दृश्यंत भादलीकर यांच्याकडे उपचार घेत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास या तरुणीची आई पार्वती (58) यांनी भाजी तळली होती. मुलगी शीतल हिला खाऊ घातल्यानंतर आई पार्वती या भांडी घासण्यासाठी किचनमध्ये गेल्या. इतक्यात शीतल ही खाली जाऊन परत येते असे आईला सांगून इमारतीतून खाली उतरली आणि अचानक बेपत्ता झाली. मुलगी वेळेत परत न आल्याने आई पार्वती या खाली येऊन तिचा शोध घेऊ लागल्या. जवळच राहणाऱ्या मुलाच्या घरी शीतल गेली असावी, म्हणून आईने तेथे जाऊनही शोध घेतला. मात्र कुठेही आढळून न आल्याने पार्वती यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन शीतल हरवल्याची तक्रार दाखल केली. 5 फूट उंच असलेल्या शितलने घराबाहेर पडताना पांढरट गुलाबी रंगाची कुर्ती आणि काळ्या रंगाची लेगिन्स परिधान केली आहे. भानुशाली कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी शितलला शोधून काढण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. पोलिसही तिचा सर्वत्र शोध घेत आहेत. मात्र गेले 24 तास शोध घेऊनही कुठेही सापडत नसल्याने शीतलच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढत चालले आहे. या तरुणीचे कुणी तरी अपहरण केले असावे, असा दाट संशय असून पोलिसही तिचा कसोशिने शोध घेत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!