ठाणे

पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागुहातील पीओपी छत पडले… कार्यक्रम मात्र सुरूच..

  डोंबिवली :-  ( शंकर जाधव   ) मे महिन्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील `फ` प्रभाग कार्यालयाच्या सभापतींच्या दालनाबाहेरील छताचे प्लास्टर पडले होते.  आता दोन महिन्यानंतर  डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागुहातील पीओपी छत पडले. या घटनांमुळे डोंबिवली विभागीय कार्यालय धोकादायक झाले आहे हे दिसून येते. ४८  वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली असून प्रशासनाने `फ` आणि `ग` कार्यालये हलवण्याचा निर्णय घेतला असला तरी आज कर्मचारी आणि या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यातअसूनही पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसली आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन शहरातील इतर अतिधोकादायक इमारती पाडण्याचे आदेश देत आहे. मात्र दुसरीकडे आपल्याच कार्यालयाची अवस्था प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल विचारला जात आहे.

सदर इमारत उभारल्यानंतर ९  ऑगस्ट १९७० रोजी  उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे या इमारतीला बांधून 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर डॉ. बाबसाहेब सभागृहाचे १० फेब्रेवारी १९८० साली उद्घाटन झाले. डॉ.बाबसाहेब आंबेडकर सभागृहाचे पिओपी छत पडल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनात आले. मात्र तरीही या सभागृहात कार्यक्रमासाठी आधीच तारीख दिल्याने पिओपी छत पडल्याच्या घटनेकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले.या सभागृहातील इतर ठिकाणचे पीओपी छत पडल्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. सदर इमारतीच्या छताच्या ठिकठिकाणी खपल्या उडाल्या आहेत. इमारतीतील स्वच्छतागृहातून खालच्या मजल्यावर पाण्याचा अभिषेक होत असल्यामुळे कार्यालयाला गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले आहे. तुटलेल्या लाद्या, तुटके दरवाजे-खिडक्या, गळणारे नळ, भिंतीना वाळवी लागल्याने फायली, कागदपत्रे खराब होत आहेत. छताच्या लोखंडी शिगा बाहेर डोकावत असल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसर सुधारणा योजनेतून या इमारतीच्या जागी नवी सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यात या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील `फ` प्रभाग कार्यालयाच्या बाहेर असलेल्या छताच्या प्लास्टरचा भाग कोसळला होता. सदर इमारतीत चालणारी सर्व कार्यालये या कार्यालयाच्या जवळच असलेल्या पी पी चेंबर्स इमारतीत हलवण्याचा निर्णय घेतला होता. फर्निचर बनवण्याचे काम सुरू आहे. ते संपल्यावर हे कार्यालय हलवण्यात येईल, असेही प्रशासनाने सांगितले होते. तळ मजल्यावर `ग` प्रभाग कार्यालय असून हे कार्यालय सुनीलनगर येथिल महिला भवनात हलवण्यात येणार आहे. मात्र प्रशासन अतिशय संथ गतीने निर्णय घेत असल्याचे दिसते. एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन शहरातील इतर अति धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश देत आहे. मात्र दुसरीकडे आपल्याच कार्यालयाची अवस्था प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल विचारला जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!