ठाणे दि २८ ऑगस्ट २०१९ : प्राथमिक शिक्षणात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करता यावे यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था ठाणे यांच्या माध्यमातून ‘करू प्रयोग शिकू विज्ञान’ ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यकम अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सभागृहात पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
करू प्रयोग शिकू विज्ञान या पुस्तकाला विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ही पुस्तिका विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तिकेत इयत्ता ३ री ते ८ वीच्या पाठ्यपुस्तकातील १२३ प्रयोग आहेत. प्रयोगांचे लेखन सोपे, सुटसुटीत असे आहे. शिवाय पुस्तकात काढलेल्या सुबक आकृत्या विद्यार्थांना प्रयोग करण्यास कुतूहल जागृत करणाऱ्या आहेत.
या पुस्तकाचे लेखन-संपादन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या विजया चिंचोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून संपादन विषय सहाय्यक (विज्ञान) जयश्री वारंगुळे आणि विषय सहाय्यक (आय टी) अलंकार वारघडे यांनी केले. तर लेखन पांडुरंग भोईर, ज्योती बेलवले, वर्षा काळे, राम माळी, अश्विनी यशवंतराव, संदिप धुमाळ, किसन पवार, कृष्णा साळी यांनी केले आहे.
पाठ्यपुस्तकातील प्रयोगांना समांतर असलेल्या इतर प्रयोगांचे व्हिडीओ देखील क्यु आर कोडच्या माध्यमातून दिले आहेत. शिवाय हे पुस्तक www.diecpdthaneit.blogspot.com या ब्लॉगवरून मोफत डाऊनलोड करता येणार आहे.