भारत

मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान तर प्रभात कोळीचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ सन्मान

नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्राचे सुपूत्र मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- २०१९’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन आदी मंत्री, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या शानदार कार्यक्रमात हॉकीप्रशिक्षक मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य जीवनगौरव तर टेनिस प्रशिक्षक नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. सागरी जलतरणातील उत्तम कामगिरीसाठी जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाच्या ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ गौरविण्यात आले. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

मर्झबान पटेल यांनी घडविले ऑल्मिपीयन खेळाडू

हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल यांनी गॅवीन फरेरा, विरेंद्र स्केना, नासिर खान, युवराज वाल्मीकी, ॲड्रीन डिसुजा, देवेंद्र वल्मिकी आदी ऑल्म्पिीक हॉकी खेळाडू घडवले आहेत. हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्ती झाल्यानंतर पटेल यांनी खेळाप्रती आपली प्रतिबध्दता दाखवून प्रशिक्षण कार्य सुरुच ठेवले. पटेल हे गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. मर्झबान पटेल यांनी हॉकी प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले .

टेनिस प्रशिक्षक नितीन किर्तने यांच्या योगदानाची दखल

मुंबईतील नितीन किर्तने यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाकप, दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदक जिंकली आहेत. वयाच्या 5 व्या वर्षापासूनच त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली. डावखुरे खेळाडू असणारे किर्तने यांनी एकेरी आणि दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभाग घेवून उत्तम रँकींग मिळविली आहे. निवृत्ती नंतर त्यांनी अनेक युवा टेनिसपटूंना प्रशिक्षण दिले त्यांच्या योगदानाची दखल घेवून त्यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सागरी जलतरणातील साहसासाठी प्रभात कोळीचा सन्मान

सर्वात कमी वयात जपान सुकानु चॅनल पार करण्यासाठी आणि १ महिन्यापेक्षाही कमी कालावधित दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शेजारील सहा खुले वॉटर ब्रॉडकास्ट पूर्ण करण्याच्या कामगिरीसाठी प्रभात कोळी याची ‘लिमका बुक ऑफ नॅशनल रेकॉर्डमध्ये’ नोंद झाली आहे. नवी मुंबई येथील नेरूळ भागातील प्रभात कोळी या १९ वर्षाच्या युवा जलतरणपटुने न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल, जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि केपटाऊनचा समुद्र असे आठ खडतर टप्पे पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली आहे. प्रभातच्या साहसी कार्याची नोंद घेवून त्याला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!