मुंबई : चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरीही अजून भाजपा-शिवसेना महायुतीने अध्याप पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. आमचं ठरलंय असं सांगून निवडणूक लढवली आणि आज सगळंच अधांतरी करून ठेवले आहे. शिवसेना फिफ्टी फिफ्टी फॉरमूल्यावर ठाम असून अडीच वर्षे मुख्यमंत्री पद ही मागणी आहे. आज राज्यपालांना भाजपाचे आणि शिवसेनेचे नेते वेगवेगळे भेटले यामागे नक्की गूढ काय आहे कोणालाच माहीत नाही. दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले की, दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात आली.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नुसार समसमान जागा वाटप ठरल्यानंतर तडजोड का? मुख्यमंत्री बाबत भाजपाचा प्रस्ताव येवू द्या मग बोलू असे राऊत म्हणतात. दरम्यान सततच्या टिकेने तसेच सामानामधील अग्रलेखातून शिवसेना भाजपावर जी आगपाखड करीत आहे त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत त्यामुळे अमित शहा यांची देखील मुंबई भेट पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपा 31 ऑक्टोबरला एकटाच राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा पेश करणार आहे. परंतु शिवसेनेने याबाबत मौन धरल आहे.
भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे असे म्हणाले. दोन्ही बाजूंनी सहमती झाल्यावर हा सत्तेचा गुंता सुटेल असेही पाटील म्हणाले. सध्यातरी दोन्ही पक्षामार्फत दुसऱ्या फळीतील नेत्यामार्फत आक्रमकपणे विधानं करणे चालू आहे.आम्हाला इतर पर्याय उपलब्ध आहेत असे सांगून शिवसेनेने बार्गेनींग पॉवर वाढविण्याचा प्रयत्न केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडू असे सांगून शिवसेनेची बार्गेनींग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून आधी करारनामा नंतरच सरकारनामा अशी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत आम्ही सर्वात जास्त जागा जिंकणारे आहोत त्यामुळे मुख्यमंत्री आम्हाचाच असेल असे स्पष्ट केले आहे. खरंतर महाराष्ट्राची जनता वाट पाहत आहे परंतु सध्यातरी हा प्रश्न लवकर सुटणार नाही हे नक्की. शिवसेना आणि भाजपामध्ये सध्यातरी दिवाळीचे फटाके पाहायला मिळत आहेत.