डोंबिवली ( शंकर जाधव ) पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी ,पावसाळयात आणि पावसाळयानंतर एकूण ५ हजार ८२३ खड्डे बुजवले असून यासाठी खड्डे बुजवण्यासह रस्ते दुरुस्तीसाठी १७ कोटीच्या निधींपैकी ८५ टक्के निधी खर्ची घातल्याची माहिती दिली या माहितीनुसार पालिकेने एका खड्ड्यासाठी सुमारे २४ हजारांच्या आसपास खर्च केल्याचे पालिकेने खड्डे व खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या निधीच्या आकड्यावरून दिसून येत आहे .दरम्यान इतका खर्च केल्यानंतर देखील नागरिकांची खड्ड्यापासून सुटका होत नसल्याचे दिसून येत आहे
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्यासाठी सुमारे १७ कोटी रूपयांचे खर्च प्रस्तावित केले होते. यंदा धुवाधार झालेल्या पावसामुळे पालिका हद्दीतील रस्त्याची दुर्दशा झाली होती .रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे पालीका प्रशासन टीकेची धनी ठरले होते .कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रस्त्यावर एकून ६१४३ खड्डे पडले होते त्यातील ५ हजार ८२३ खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यत खड्डे बुजविण्यासाठी एकून निधीच्या ८५ टक्के निधी म्हणजेच १४ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत या आकडेवारी नुसार एक खड्डा बुजवण्यासाठी सुमारे २४ हजार ८०० रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याच दिसून येते .याबाबत पालिका प्रशासनाने मात्र एकच खड्डा मागील ४ महिन्याच्या कालावधीत वारंवार बुजवावा लागल्याने खर्च वाढल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे दरम्यान इतक्या प्रचंड खर्चानंतरही पालिका क्षेत्रातील रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे अजूनहि आहेत. याबाबत जागरूक नागरिक संघाचे श्रीनिवास घाणेकर यांनी रस्त्यांवर आजही खड्डे मोठ्या प्रमाणात असुन कोणत्या भागातील खड्डे महापालिकेने बुजवले आहे याची शहानिशा होणे गरजेचे असल्याचे सांगत याची माहिती पालिका प्रशासनाकडून मागविली आहे.तत्कालीन आयुक्त पी, वेलारासु यांनी कोणतेही खड्डे भरताना त्यांचा आकार चौकोनी स्वरूपात करून घेऊन मगच असे खड्डे बुजवले जावेत असे स्पष्ट लेखी निर्देश दिलेले असतांना ही अशी प्रक्रिया अवलंबली जात नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तर एवढा खर्च करूनही कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आजही असुन ही संपुर्ण प्रक्रिया संशायास्पद असल्याचे सांगत या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी ,ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पालिका आयुक्याकडे केली आहे .तर पालिका अधिकारी रघुवीर शेळके यांनी यंदा पावसात तब्बल ७ ते ८ वेळा खड्डे बुजवावे लागले असून अद्यापि पाउस पडत असल्यामुळे खड्ड्याची समस्या कायम असल्याचे सांगितले.