तिसऱ्या प्रयत्नानंतर बोअरवेलला लागले पाणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) मनुष्य, मन आणि माणुसकी या सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यात सावरदेव या शहापूर तालुक्यातील तानसा तलावाजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या सोयीकरिता बोरवेलचे काम हाती घेतले होते. दोन ठिकाणी प्रयत्न करूनही पाणी लागले नव्हते. तरीही या संस्थेने मुलांच्या मूलभूत गरज असलेल्या पाण्याची सोय व्हायला हवी, हा उद्देश ठेवून तिसऱ्या जागी बोरवेल मारली आणि तिला पाणीही लागले.
सोमवारी या बोरवेलला मोटरपंप व इतर पाईपलाईनचे काम करून घेतले. अतिशय जोरदार पाण्याचा फोर्स या बोअरवेलला लागला आहे. येणाऱ्या अनेक वर्षांसाठी या शाळेतील मुलांना आता या बोरवेलमुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. विशेष म्हणजे बोअरवेलला लागलेले धो धो पाणी पाहून आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. या कामासाठी संस्थेला आतापर्यंत २ लाखाच्यावर खर्च आला आहे. आता तेथे मुलांसाठी टॉयलेट बांधायला घेतले आहे. त्याचबरोबर पाण्याची साठवण करण्यासाठी उंचावर पाण्याची सिंटेक्स टँक, वॉश बेसिन, आदी सुविधा येत्या १० दिवसांत करून घेणार आहोत, असे संस्थेचे डोंबिवलीकर अध्यक्ष विजय देशमुख यांनी सांगितले. तर या सर्व कामासाठी आमच्या मनुष्य, मन माणुसकीच्या अनेक सदस्य आणि हितचिंतकांनी खूप मेहनत घेतली. या व्यतिरिक्त संस्थेच्या सदस्यांसह संस्थेबाहेरील व्यक्तींनीही या कार्यासाठी हातभार लावल्याची माहिती संस्थेच्या सल्लागार अमृता कारखानीस यांनी दिली.