महाराष्ट्र

‘मलाही कलेक्टर व्हायचयं.. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा’..!

एक दिवसाच्या जिल्हाधिकारी पुनम देशमुख यांच्या अपेक्षा

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा अभिनव उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून 8 मार्चपर्यंत महिला सप्ताह

सुदृढ आरोग्यासाठी ‘पिंक वुमेन’ सप्ताहही राबविणार

बुलडाणा, दि.2: माझं नाव पुनम प्रल्हाद देशमुख… जिल्हा परिषदेच्या पाडळी ता. बुलडाणा शाळेची इयत्ता 8 वी मधील विद्यार्थीनी.. आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस.. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी व्हायचा मान मिळाला.. मी आज दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेणार आहे.. मलाही भविष्यात कलेक्टरचं व्हायचं आहे.. त्यासाठी अभ्यास करून कठोर परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे.. ही प्रतिक्रीया आहे.. एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनलेल्या पुनम प्रल्हाद देशमुख यांची.

माझ्या मोठ्या बहीणीची जिल्हाधिकारी व्हायची इच्छा होती. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे तिचे जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न अधुरेच राहीले आहे. तिचे स्वप्न मी पुर्ण करणार आहे. मला जिल्हाधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सातत्यपूर्ण अभ्यास करून जिल्हाधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. मुलींनी चांगला अभ्यास करून अपली क्षमता सिद्ध करावी, असा मानसही पुनमने व्यक्त केला.

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून आजपासून जिल्ह्यात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुणवंत विद्यार्थीनीला जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत बसवून तीला प्रशासनाचा अनुभव देण्याचा उपक्रम आज राबविण्यात आला. तसेच महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पिंक वुमेन सप्ताहही राबविण्यात येणार आहे. आज जिल्हा परिषदेच्या पाडळी येथील शाळेची विद्यार्थीनी पुनम देशमुख यांनी जिल्हाधिकारी बनून काम केले.

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी एक दिवसाच्या जिल्हाधिकारी पूनम देशमुख यांना स्वत: जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत बसवून त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला. यानंतर पुनम देशमुख यांनी जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व पिकांच्या नुकसानीसंदर्भात उपस्थित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याकडून आढावा घेतला. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी खामगांव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची माहिती दिली. त्यानंतर एक दिवसाच्या जिल्हाधिकारी पुनम देशमुख यांनी लोकशाही दिन कार्यवाहीचे कामकाज अनुभवले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, भुषण अहीरे आदी उपस्थित होते.

आत्मविश्वास वाढावा, प्रशासनात येण्यासाठी मुलींना प्रेरणा मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘एक दिवसा साठी जिल्हाधिकारी’ हा उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम ‘इमरजन्स इन गव्हर्नन्स’ (immersion in governence) या संकल्पनेवर आधारीत आहे. या उपक्रमाबरोबरच ‘पिंक वुमेन सप्ताह’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांवर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सप्ताहात 2 मार्च रोजी ग्राम आरोग्य पोषण व समुपदेशन दिन साजरा केल्या जात आहे. 3 मार्च रोजी महिलांसाठी रक्तक्षय चाचणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर घेण्यात येणार आहे. तसेच 4 मार्च रोजी गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी मातृत्व संवर्धन दिन साजरा करण्यात येणार आहे. 5 मार्च रोजी महिलांमधील विविध कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी महिला आरोग्य शिबीर व कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सप्ताहात 6 मार्च रोजी वयोवृद्ध महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरात संशयीत कर्करोग रूग्णांची संदर्भ सेवा व तपासणी करण्यात येणार आहे.

पुढे 7 मार्च रोजी किशोरवयीन आरोग्य व विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यासाठी किशोरवयीन मुलींची मासिक पाळीतील स्वच्छता संवर्धन सभा आयोजित करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक महिला दिनाच्या ‘जनरेशन इक्वालिटी’ अर्थात ‘माझी पिढी आहे समानतेची : जाणीव आहे मला स्त्री हक्काची’ या थीमनुसार हा महिला आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. तरी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या एक दिवसाकरीता जिल्हाधिकारी व महिला आरोग्य सप्ताह या उपक्रमांमुळे निश्चितच महिला सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!