मुंबई : करोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावले उचलत आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी कमी करून करोनाचा संसर्ग टाळायला हवा. मुंबईतील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत आहे. तोच विचार पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनावश्यक प्रवास टाळावा, जर अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा नाईलाजास्तव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, करोना रोखण्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे. राज्यातला बाधितांचा आकडा 5१ वर गेला आहे. सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ते निर्णय पुढचे आदेश निघेपर्यंत कायम राहतील. मुंबई, पुणे, पिंपरी आणि नागपुरातील अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने, कार्यालये बंद राहतील. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दी करू नये फक्त मोजकी लोकं जमावी. जर शक्य असेल तर लग्न पुढे ढकला. हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे, गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे, लग्न असो की कोणतंही कार्य, दहावं-तेरावं कार्य असलं तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा. लग्न, अंत्यविधी, दशक्रिया विधीतील गर्दी टाळा, असे अजित पवार म्हणाले.