ठाणे

नागरिकांची भाजी मंडईमध्ये गर्दी करू नये, घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देणार – जिल्हाधिकारी

ठाणे दि. २४ – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरी देखील नागरिक बाजारामध्ये तसेच भाजीमंडई गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगर पालिकांना किरकोळ हातगाडी विक्रेत्यांच्या मार्फत चौकाचौकामध्ये भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी देखील मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये याबाबत संबधितांना सूचना देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

या भाजी विक्रेत्यांनी सर्व सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझर चा वापर करावा. भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी केले आहे.

किराणामालाची दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक आहे. उगीचच घाबरून जावून साठा करून ठेवू नका. किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जावून खरेदी करण्यापेक्षा यादी तयार करून पाठवावी. व दुकानदाराने दिलेल्या वेळी जावून सामानाची उचल करावी. जेवढी गर्दी टाळणे शक्य तेवढी गर्दी टाळा,सुरक्षित अंतर राखा प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!