महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटींची मदत

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही दिले एक दिवसाचे वेतन

मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पे ऑर्डर उपमुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

मुंबई, दि. 9 : कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले असून त्याची एकुण रक्कम 22.75 लाख रुपये देण्यात आली. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि बँकेचे अध्यक्ष श्री. हसन मुश्रीफ यांनी या दोन्ही मदतीसाठीची बँकेची पे ऑर्डर उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केली.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशातील सर्व राज्यांमध्ये झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राज्यशासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणे, गोरगरीब मजूर, स्थलांतरीत कामगार यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे, सर्व ठिकाणांची स्वच्छता करुन जंतुनाशकांची फवारणी करणे यांसारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात येत असल्याची भावना बँक प्रशासनामार्फत व्यक्त करण्यात आली. हीच सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा दृष्टीकोन ठेवून बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही मदतीसाठीच्या बँक पे ऑर्डर मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या.

कोरोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने मुकाबला करण्यासाठी राज्य शासनासोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 2 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!