ठाणे : शीळ – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील दिवा, दातिवली, साबे, व शिळ व देसाई परिसरातील नाल्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची व गटारांची साफसफाई करण्याची मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. दिवा विभागात अनेक नाल्यांची सफाई होत नाही त्यामुळे पावसाळ्यामध्ये दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.
गतवर्षी दि. ०४ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी घुसले. या परिसरात प्रचंड अतिवृष्टी होत असताना बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होवू लागल्याने पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व संपूर्ण दिवा परिसर जलमय झाला. सुमारे सात ते आठ फुटांपर्यंत पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने दिव्यातील संपूर्ण परिसरातील चाळी, दुकाने व घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. त्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
दिवा विभागातील बेडेकर नगर, म्हसोबा नगर, वक्रतुंड नगर, ओमकार नगर, बी आर नगर, सुरेश नगर, श्लोक नगर, शिवशक्ती नगर, सदाशिव दळवी नगर, दातिवली, सिद्धिविनायक नगर, विकास म्हात्रे गेट, दिवा आगासन रोड, तिसाई नगर, टाटा पॉवर लाईन, विठ्ठल रखुमाई नगर, मुंब्रादेवी कॉलनी, बेतवडे, म्हातार्डी, आगासन, डी जी कॉम्प्लेक्स, नॅशनल शाळेजवळ, डम्पिंग परिसर, यशवंत नगर, साबेगाव, कोकणरत्न, विष्णू पाटील नगर, दिवा बंदर आळी, एन आर नगर, नागवाडी विभागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरते व नागरिकांच्या घरामध्ये जीवनावश्यक तसेच इतरही अनेक वस्तूंचे अतोनात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
त्यामुळे दिवा विभागातील बी. आर. नगर, मुंब्रादेवी कॉलनी, गणेश नगर, वैभव ढाबा ते साबे गाव, बेडेकर नगर येथील नाला, दातिवली स्मशानभूमी येथील नाला, शिळ गावाला जोडणारा नाला अशा नाल्यांची तातडीने साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पश्चिमेकडील बंदरआळी, नागवाडी, साबे, दातिवली, आगासन, म्हातर्डी, देसाई, खिडकाळी, पडले, डायघर, शिळ, खार्डी या गावातील गटारांची साफसफाई करणे गरजेचे आहे.
सदर परिसरात गटारातील खराब पाणी साचून राहिल्याने रोगराई तसेच साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे येथील गटार व नाले जेसीबी अथवा पोकलेनच्या सहाय्याने काढणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच भोलेनाथ नगर, शिबली नगर व ठाकूरपाडा येथील नाले व गटार सफाईची कामे पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिवा – शिळ – देसाई विभागातील नाले व गटार सफाई पावसाळ्यापूर्वी करण्याची माजी आमदार सुभाष भोईर यांची मागणी
