कोकण

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर !

मुंबई : कोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला होता. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं होतं. पण आता चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय.

केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरूप पाठवणार आणि परत आणणार असल्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलंय. त्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न पडलेल्या चाकरमान्यांना कोकणात एसटीनं प्रवास करता येणार आहे. असं असलं तरी त्यासाठी काही नियमावलीचं पालन देखील करावं लागणार आहे.

राज्य सरकारने क्वारंटाईन कालावधीबाबत आयसीएमआरकडे मार्गदर्शन मागवलं आहे. मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली कोकणातल्या आमदारांची बैठक झाली होती. यामध्ये चाकरमानी कोकणात कसे जाणार? यावर चर्चा झाली. तसेच कोकणातल्या चाकरमान्यांवरून कोणीही राजकारण करू नये असा टोला अनिल परब यांनी विरोधकांना लगावलाय. गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या परंपरागत घरी जाऊन उत्सव साजरा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढतोय. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्या.

अशी घ्या खबरदारी

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. मुंबईत आपण मोठ्या गणेश मंडळांशी बोलून त्यांच्या एकमताने यंदाचा उत्सव साजरा करण्याबाबत काही नियम ठरविले आहेत. कोकणातही त्याचे पालन होणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनीसुद्धा आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत, उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे तुमच्या भागात हा संसर्ग पसरणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

बेड्स, रुग्णवाहिका तयार ठेवा

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडाची लवकरच कार्यान्वित होईल. त्यांच्या क्षमता वाढवता येतात का ते पाहण्याच्या तसेच या जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात रुग्णवाहिका पुरेशा राहतील हे पाहावे जेणे करून गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील असे ही मुख्यमंत्री म्हणाले.
गावोगावच्या दक्षता समित्यांनी या काळात सर्व गावकरी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे, स्वच्छतेचे पालन करताहेत का ते नियमित पाहावे तसेच जनजागृतीही करावी असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वपक्षीय नेत्यांनी देखील या उत्सवाच्या निमित्ताने शासनास सहकार्य करावे व सुरक्षितता राखण्याविषयी कोकण वासियांना आवाहन करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक गावात ग्राम कृती दल

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, १०४९ पैकी ६६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण ३६ मृत्यू आजवर झाले आहेत. १४९६ बेड्सची सुविधा केली आहे. २०० रुग्ण सध्या याठिकाणी दाखल आहेत.१०० बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत २०० चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल,नागरी कृती दल स्थापन केले आहेत तसेच जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या तीन बैठका झाल्या आहेत असेही ते म्हणाले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!