मुंबई  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. मात्र या कर्मचारी कपातीवर रतन टाटा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते YourStory या न्यूज वेबपोर्टलसोबत बोलत होते.
कर्मचारी कपातीवरून रतन टाटा म्हणाले, कंपन्यांच्या टॉप लीडरशिपकडील संवेदना कमी झाली आहे. ज्या लोकांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यांनी स्वत:चे करिअर कंपनीसाठी दिले. त्यांना अशा संकट काळी पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही त्यांना बेरोजगार करत आहात.
ते पुढे बोलले की, उद्योग क्षेत्रातील टॉप लीडर्सना टाटांनी हा प्रश्न विचारला की, या काळात तुमचे कर्तव्य काय? तुमच्यासाठी नैतिकतेची व्याख्या काय? जे तुम्ही स्वत:च्या कर्मचाऱ्यांशी अशा पद्धतीने वागत आहेत. कोरोना आर्थिक संकट आल्यानंतर सर्व कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. पण टाटा ग्रुप याला अपवाद ठरला. टाटा ग्रुपने फक्त वरिष्ठ व्यवस्थापनातील लोकांच्या पगारात २० टक्के कपात केली. टाटा ग्रुपने एकाही कर्मचाऱ्याला काढून टाकले नाही.
व्यवसायात नफा कमावने चुकीचे नाही पण हे काम नैतिकतेने करणे गरजेचे असल्याचे टाटा म्हणाले. तुम्ही नफा मिळवण्यासाठी काय करता हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. नफा कमवताना कंपन्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ते ग्राहक आणि शेअरधारकांसाठी काय व्हॅल्यू अॅड देत आहेत. सध्याच्या व्यवस्थापकांनी हा प्रश्न सातत्याने स्वत:ला विचारला पाहिजे की, जो निर्णय ते घेत आहेत ते खरच बरोबर आहेत का?
अशा कंपन्या कधीच टीकणार नाहीत
ज्या कंपन्या स्वत:च्या लोकांबद्दल संवेदनशील नाहीत त्या भविष्यात कधीच टीकणार नाहीत, असे रतन टाटा म्हणाले. व्यवसायाचा अर्थ फक्त नफा कमवण्याचा नसतो. तुम्ही शेअरधारक, ग्राहक आणि कर्मचारी यांच्याशी जोडले गेले पाहिजेत. त्यांचे हित लक्षात घेतले पाहिजे.
टाटा उद्योग समूहात विमान सेवा, हॉटेल, आर्थिक सेवा,ऑटो आदींचा समावेश होतो. ही अशी क्षेत्र आहेत ज्याच्यावर करोनामुळे सर्वाधिक परिणाम झालाय. विमान सेवा आणि हॉटेल व्यवसायातील परिस्थिती सर्वांना माहित आहे. ऑटो सेक्टरची परिस्थिती अशीच असून गाड्यांची विक्रीत प्रचंड घट झाली आहे. असे असून सुद्धा टाटाने एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकेल नाही.