महाराष्ट्र

खोडाळा येथील मोहिते महाविद्यालयात ‘ ग्रंथपाल दिन ‘ साजरा

मोखाडा  (दीपक गायकवाड )- भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (१२ ऑगस्ट) गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला,वाणिज्य, विज्ञान व बीएमएस महाविद्यालय आणि यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी या महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथपाल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
           ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयांचा विकासात डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांची रूजवला. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ.रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ.रंगनाथन यांनीच देशात रुजविला. पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. बदलत्या समाजव्यवस्थेत ग्रंथपालाची भूमिकाही झपाट्याने बदलत आहे. करिअरच्या असंख्य संधी या क्षेत्रात उपलब्ध होत असून, ई-ग्रंथपाल ही नवी संकल्पना इंटरनेटमुळे प्रचलित होऊ लागली आहे. मात्र, शाळा तेथे ग्रंथालय आणि ग्रंथपाल ही संकल्पना अजूनही साकार होताना दिसत नाही. एप्रिल महिन्याचा दुसरा गुरूवार हा जागतिक विशेष ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.
              ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही रुंदावने  आवश्यक आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.तुकाराम रोकडे यांनी केले. यावेळी गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्रा.दीपक कडलग, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.वाय. जे.शिद, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रवर्तन काशीद, प्रा.नवनाथ शिंगवे, शिवाजी शिंदे, राहुल नागवंशी, सिद्धार्थ मोहिते, मधुकर पाटील, दौलत बागुल, सुनील सोनवणे, जयराम मौळे आदी.उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!