महाराष्ट्र मुंबई

रायगड जिल्ह्यातील पीडित मुलीच्या कुटुंबासमवेत मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

महिला अत्याचाराविरुद्धचे कायदे कठोर करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 8 : रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अत्याचार व हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहिल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुटुंबियांना सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची वेळ मागितली होती. यावेळी झालेल्या या चर्चेत मुलीचे आई-वडील, आजोबा, पंचक्रोशीतील सरपंच तसेच मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, दक्षिण रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक, अनिल पारस्कर, रोहा येथील उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, मराठा क्रांती मोर्चाचे विलास सुद्रीक, राजन घाग, रूपेश मांजरेकर, नामदेव पवार, विवेक सावंत आदी मंडळी सहभागी झाली होती.

महिला अत्याचाराविरुद्धचे कायदे कठोर करणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व तिच्या हत्येची घटना ही दुर्देवी आणि मनाला यातना देणारी आहे. मुलीच्या पालकांच्या भावनांची कदर करून या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य शासन कोणतीही कसूर ठेवणार नाही.

कोविड परिस्थितीमुळे समंजसपणाची भूमिका घेऊन प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकरणी करण्यात येणारे आंदोलन स्थगित केल्याबद्दल ग्रामस्थ, मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. महिला अत्याचाराविरुद्ध कठोर कायदे व्हावे, या पीडित मुलीच्या पालकांची मागणी योग्य असून यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी पीडितेच्या पालकांना आश्वस्त केले.

तांबडी अत्याचार प्रकरणी 7-8 दिवसांत आरोपपत्र दाखल होईल – अशोक चव्हाण

या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून यापूर्वीच नियुक्ती झाली असून, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाईल.

तसेच महिला अत्याचारांसंदर्भात अधिक कठोर कायदा करण्याची सरकारची तयारी आहे. तांबडी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले की, राज्य शासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली असून या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून मदत देण्यात येणार आहेत. तसेच हा खटला माणगाव न्यायालयात द्रुतगती पद्धतीने चालविणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी समाजाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग यांनी या प्रकरणाची तत्परतेने दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!