ठाणे

माजी नौसैनिकावर “भ्याड हल्ला” प्रकरणी निषेध !

अंबरनाथमध्ये सेवानिवृत्तीधारकांचा “कँडल मार्च”

अंबरनाथ दि. १४ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : मुंबईत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी “माजी सैनिकाचा अपमान, नही सहेगा हिंदुस्थान” च्या घोषणा देत सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी व युनायटेड एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनच्या वतीने अंबरनाथ पूर्व हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या संख्येने “कँडल मार्च” काढण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने जाहीर पाठींबा देत राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

 

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखा विरोधात कारवाई करण्याचे नाटक “ठाकरे सरकार” कडून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवून हे ठाकरे सरकार लोकांना मुर्ख बनवण्याचे काम करत आहे. छत्रपतींच्या राज्यात कधीच सैनिकांना अपमानास्पद वागणूक दिली गेली नाही, कधी महिलांचा अपमान केला नाही. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात एका माजी नौसेना अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना सरकार पाठीशी घालत दादागिरी,गुंडशाहीला खतपाणी घालून दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहे, माजी सैनिक मदन शर्मा यांच्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा व त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अंबरनाथमधील माजी सैनिक सेवानिवृत्तीधारकांनी करत “कँडल मार्च” मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला.

 

माजी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे त्यांच्या घरात घुसून शिवसेनेचा शाखाध्यक्ष कमलेश कदम व त्याच्या ८ ते १० साथीदारांनी जबर मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस शर्मा यांनाच अटक करण्यास गेले होते. परंतु राज्याला गुंडगिरीचे राज्य बनवू पाहणाऱ्या ठाकरे सरकारच्या दबावाखाली येऊन अखेर पोलिसांनी जामीनपात्र कलम लावून केवळ कारवाईचा फार्स करत,काही क्षणातच सर्व आरोपींना रात्री पोलीस स्थानकातूनच जामीन मंजूर करून सोडून देण्यात आले. मारहाण झालेले मदन शर्मा हे इस्पितळात आहेत आणि आरोपी मोकाट सुटले आहे. स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशसेवा करणाऱ्या निवृत्त सैनिकाला शिवसेनेच्या गुंडाकडून ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आहे हि बाब शरमेने मान खाली घालणारी असून शिवसेनेने व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तमाम जवानांची व महाराष्ट्राची माफी मागावी अशी भाजपा शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांनी मागणी केली आहे.

एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरात घुसून शिवसैनिकांकडून एवढी जबर मारहाण केली जात असताना सुद्धा राज्याचे ठाकरे सरकार झोपेचे सोंग घेत असून, महाराष्ट्राला शिवसेनेच्या गुंडाचे राज्य बनविण्याचे काम केले जात आहे, सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना मारहाण केली जात आहे, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्या विरोधात सुडाचे राजकारण करण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली असून त्यांचा माज महाराष्ट्राची जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

“कँडल मार्च” मोर्चाचे आयोजन यूनाइटेड एक्स सर्विसमैन असोसिएशन व भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस माधवी सिंग यांनी केले होते. या मोर्चात भाजपा नेते विश्वजित गुलाबराव करंजुले-पाटील, जिल्हा सचिव संतोष शिंदे,अंबरनाथ सरचिटणीस दिलिप कणसे, व्यापारी आघाडी अध्यक्ष खानजी धल, मंजु धल, रुपाली लठ्ठे, उज्वला कबरे, आरती मेहता, विश्वास निबांळकर, श्रीकांत रेड्डी, सुनील वाघमारे, आशिष साळवे, मनोज सिन्हा व मोठ्या संख्येने नेव्ही रिटायर्ड अधिकारी सामील झाले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!