ठाणे

 कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत लोकसंख्‍येची घनता जास्‍त असूनही मृत्‍यूदर कमी ठेवण्‍यात महापालिकेला यश ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 

डोंबिवली ( शंकर जाधव ):  कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत लोकसंख्‍येची घनता जास्‍त असूनही मृत्‍यूदर कमी ठेवण्‍यात महापालिकेला यश आले आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. महापालिकेच्‍या डोंबिवली पूर्व येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टाच्‍या जागेवर उभारण्‍यात आलेल्‍या कोविड समर्पित आरोग्‍य केंद्राच्‍या लोकार्पण सोहळया समयी त्‍यांनी हे उद्गार काढले. बेड रिकामे राहिले तरी चालतील पण बेडस उपलब्‍ध न झाल्‍यामुळे रुग्‍ण दगावता कामा नये, सध्‍याच्‍या कोविडच्‍या वातावरणात पत्रकारांनी सकारात्‍मक बातम्‍या करुन सकारात्‍मकता पसरवणे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्‍हणाले. पत्रकारांच्‍या मागणीनुसार पत्रकारांसाठी बेड आरक्षित ठेवण्‍याची व्‍यवस्‍था ठेवू, अशीही ग्‍वाही त्‍यांनी यावेळी दिली.

    रुग्‍णांचे हाल होवू नयेत, हा दृष्टिकोन ठेवून महापालिका या सुविधा निर्माण करीत आहे, `माझे कुटूंब, माझी जबाबदारी` या मोहिमेमध्‍ये प्रत्‍येकाने सहभाग घेतला तर लवकरच कोविडमुक्‍त होवू शकू, असा आशावाद महापौर विनिता राणे यांनी यावेळी बोलतांना व्‍यक्‍त केला.महापालिकेने कोविड रुग्‍णांसाठी चांगल्‍या प्रकारे सुविधा निर्माण केल्‍या आहेत,कोविड रुग्‍णांसाठी लागणारी औषधे स्‍टॉकमध्‍ये ठेवावी, त्‍याचप्रमाणे पत्रकारांसाठी कोविड रुग्‍णालयात आरक्षित बेड ठेवावेत, असे वक्‍तव्‍य आमदार रविंद्र चव्‍हाण यांनी यावेळी केले. काळाची पाऊले उचलून सुविधा निर्माण करा, या शासनाच्‍या निर्देशानुसार महापालिकेने कोविड-१९ साठी जम्‍बो फॅसिलीटी निर्माण केल्‍या व अजूनही करीत आहोत.

आता प्रतिदिन ९०० रुग्‍ण सापडले तरी त्‍यादृष्‍टीकोनातून इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर तयार करीत आहोत, अशी माहिती पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.`चुकलो तर टिका करा, पण कौतुकाची थाप दयायला विसरू नका` अशीही पुष्‍टी यांनी यावेळी जोडली.वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टवर उभारलेल्‍या कोविड सेंटरमध्‍ये ७५ ऑक्सिजन बेडची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून हे रुग्‍णालय वन रुपीज क्लिनीकचे डॉ. राहूल घुले यांचेमार्फत चालविले जाणार आहे. लोकार्पण सोहळयासमयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्‍हाण, महापौर विनिता राणे, आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी, सभागृह नेते प्रकाश पेणकर व इतर पालिका सदस्‍य तसेच वैदयकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. राहूल घुले, साथरोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील, डॉ. सरवणकर व महापालिकेचे इतर अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी सुत्रसंचालन महापालिका सचिव संजय जाधव यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!