ठाणे

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रेमामुळे भारावलो – निरोप घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे भावुक उदगार.

तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला
हिरालाल सोनवणे यांची महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास आयुक्ती पदी नियुक्ती
ठाणे – : गेली दीड वर्ष ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम करताना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रेमामुळे आज मी भारावलो आहे असे भावोद्गार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हिरालाल सोनवणे यांनी काढले. त्यांची महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी ते बोलत होते. माझी नाळ ही ग्रामीण आदिवासी जनतेशी जोडली गेलेली आहे.सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे आयुक्तपदी काम करताना देखील आदिवासी बांधवासाठी जे जे करता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे श्री. सोनवणे म्हणाले. ठाणे ग्रामीण भाग हा खूप मोठा भाग आहे. मात्र जिल्ह्यात काम करताना माझ्या सहकारी अधिकारी वर्गाने मोलाची साथ दिली. त्यामुळेच विविध विकास कामांमध्ये ठाणे ग्रामीण राज्यात अग्रेसर राहू शकला. माझ्या सहकार्याचा मला सार्थ अभियान असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य ) अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) नितीन पालवे, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) एच. एल. भस्मे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, जिल्हा कृषि अधिकारी डॉ. पवार, गट विकास अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते. *कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी २१ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारत त्यांनी धडक कामाला सुरुवात केली.
सर्व प्रथम जिल्हा परिषद मालकीच्या सर्व जमिनीचे एकत्रित नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेतला. ग्रामीण जगण्याचा स्वानुभव असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध महत्वाकांशी उपक्रम त्यांनी हाती घेतले. शासनाच्या योजनाची अमलबजावणी तत्परतेने केलीच शिवाय जिल्हा परिषद सेस फंडाचा वापर करत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे ही संकल्पना राबवून अवकाळी पावसाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेण्यासाठी आशेचा किरण निर्माण केला. वनराईच्या पाण्यावर केवळ शेतकरी नाहीत तर रानातील पशु-पक्षांची तहान भागवता आली. सर्वांसाठी घरे हा मा. केंद्र सरकारने केलेला विचार प्रत्येक्ष कृतीत उतरवत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांकांचे कार्य त्यांनी केले. प्रत्येक गाव हे स्वयं पूर्ण झाले पाहिजे या ध्यास उरी बाळगत स्वयंसिद्ध गाव ही संकल्पना राबवून प्रायोगिक तत्वावर मुरबाड तालुक्यातील दोन गाव स्वयंपूर्ण करण्यात यश आले.
जिल्हा स्वच्छ सुंदर राहावा, वाढत्या प्लास्टिकच्या भस्मासुराला रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्लास्टिक वापरावर बंदी आणावी असा विधायक ठराव ग्रामसभेत घेण्याचे आवाहन करत ‘एक कदम स्वच्छते की ओर’ त्यांनी टाकले. मंत्रालयीन प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर शहापूर तालुक्यातील 97 आदिवासी गावे, 259 पाड्यांना भावली धरणातून ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरी मिळवण्यात त्यांना यश आले. विविध विभागातील कर्मचारी वर्गाच्या शासन नियमाप्रमाणे पदोन्नत्या देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहिले. सध्याच्या कोविड काळात ग्रामीण भागातील कोव्हीड नियंत्रित राहावा यासाठी ते प्रयत्नशील होते. जिल्हा परिषदेत न्याय हक्कासाठी आलेला प्रत्येक नागरिक संतुष्ट होऊन गेला पाहिजे अशी त्यांची नेहमीच भूमिका राहिली.
प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव श्री. सोनवणे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेले काळखेडे गावचे. अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म आहे. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात त्यांनी यशाची शिखरं पादांक्रांत केली. 1992 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत, उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. गेल्या वीस वर्षाच्या कालखंडात विविध महत्वाच्या पदांवर काम त्यांनी केले आहे. यामध्ये उप जिल्हाधिकारी जळगाव, अपर तापी प्रकल्प अधिकारी, जळगाव, उप विभागीय अधिकारी नंदुरबार आणि शिरपूर येथे काम केले, पुढे मा. वन मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात कार्यरत होते. त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई शहर, अपर जिल्हाधिकारी मुंबई, नियंत्रक अतिक्रमण व निष्कासन बांद्रा, अपर विभागीय आयुक्त नाशिक, अप्पर विभागीय आयुक्त कोकण विभाग मुंबई अशी अनेक ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यांचा महसूल विषयक गाढा अभ्यास असून १० वर्षात प्रलंबित असलेल्या जमिनीच्या केसेसचा पूर्णपणे निपटारा करण्याची मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. २०१८ साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. काळखेडेच्या जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत कर्तुत्वाची गगनभरारी घेणारे श्री. सोनवणे यांची महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी आयुक्त पदी नियुक्ती झाली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!