ठाणे

सकल मराठा समाजाचा अंबरनाथ तहसीलवर मोर्चा

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व आगरी समाजाने दिला जाहीर पाठिंबा

अंबरनाथ दि. २२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मराठा समाजाच्या वतीने प्रयत्न सुरू होते. त्यानंतर शासनाने आम्हाला “एसईबीसी”मध्ये आरक्षण देखील दिले. परंतु, सुप्रीम कोर्टाने सकल मराठा समाजाचे होऊ घातलेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरल्याने सकल मराठा समाज अंबरनाथ यांच्यावतीने मंगळवारी अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” च्या घोषणा करत तहसीलदार जयराज देशमुख यांना रास्त मागण्यांचे निवेदन देण्यात आले व मागणी करण्यात आली की, सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला जी स्थगिती दिली आहे, ती तात्काळ उठवावी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तसेच सारथी या संस्थांची व्याप्ती वाढवून समाजातील युवकांना उद्योग व व्यवसायात उभारणीसाठी शासनाने हमी देऊन आर्थिक मदत करावी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जिल्हा तसेच तालुका स्तरावर वस्तीगृहांची निर्मिती करावी, मराठा क्रांती मोर्चा दरम्यान मराठा युवकांवर नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत, याच पार्श्वभूमीवर शिवसेना अंबरनाथ शहर शाखेच्या वतीने शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी मराठा समाजाला जाहीर पाठींबा घोषित करत जाहीर पाठींब्याचे पत्र आज सकल मराठा समाज संघाला माजी नगरसेवक निखिल अरविंद वाळेकर यांच्याहस्ते देण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व आगरी समाजाचे संजय फुलोरे यांनी ही मराठा समाजाला जाहीर पाठींबा दिला आहे.

यावेळी सकल मराठा समाज संघाचे बाळकृष्ण परब, विलास आंग्रे, पुरुषोत्तम उगले, संजय गावडे, सुभाष साळुंके, बाबुराव माने, दीपक पवार, प्रकाश डावरे, संभाजी कळमकर, अरविंद मालुसरे, प्रमोद बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!