महाराष्ट्र

खासगी बस चालकांना चाप ; जास्त भाडे आकारल्यास होणार कारवाई – राज्य परिवहन आयुक्त

मुंबई, ता 6 नोव्हे, संतोष पडवळ : दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत मुंबई व पुण्यासारख्या शहरांतून सुट्टीनिमित्त मोठ्या संख्येने प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार घडत असतात. त्याला आळा घालण्यासाठी परिवहन आयुक्तांनी यंदा कंबर कसली आहे. ज्यादा भाडे आकारणार्‍या खासगी बसेसवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

राज्यात एसटी महामंडळाने आकारलेल्या तिकीट दराच्या कमाल दीडपट भाडे आकारण्याचा अधिकार खासगी बसेसला आहेत. मात्र, दिवाळीच्या सुट्टीत मुंबई व पुणे सारख्या शहरांतून सुट्टीनिमित्त मोठ्या संख्येने प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून अधिक भाडे आकारण्याची शक्यता व्यक्त करत परिवहन आयुक्त कार्यालयाने खासगी बसेसची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधीत सर्व विभागांना पत्रसुद्धा पाठवण्यात आले आहे. दिवाळीत मुंबई व पुण्यातून मोठ्या संख्येने प्रवासी गावाकडे ये-जा करत असतात. अशावेळी प्रवाशांची खासगी बस चालकांकडून लूट होण्याची शक्यता आहे. तशा तक्रारीही कार्यालयाला येतात. म्हणूनच सर्व आरटीओंना बसेसची तपासणी करण्यास सांगितले आहे. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना या कामासाठी वायूवेग पथकांची मदत घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणांहून बसेस सुटतात, त्या ठिकाणीही भरारी पथकांमार्फत भाडे आकारणीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जास्त भाडे आकारणार्‍या बसेसच्या मालकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

इथे करा तक्रार

दिवाळीत खासगी बसमूधन प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण आल्यास किंवा प्रवाशांकडून ज्यादा प्रवास भाडे घेत असल्यास त्यांनी mvdcomplaint.enf2@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे आवाहन परिवहन आयुक्त कार्यालयाने केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!