ठाणे

बर्ड फ्ल्यूबाबत प्रशासन सतर्क

घाबरु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका

अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करणार – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे- दि. १२: ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत संपूर्ण आरोग्य यंत्रणा विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणा अधिक सतर्क  असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या जात  आहेत.जनतेने घाबरू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.

ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लु च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय यंत्रणेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त हेरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ विजय धुमाळ,ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद डॉ लक्ष्मण  पवार,उपवनसंरक्षक श्री.हिरे यांसह सर्व मनपांचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्ह्यात एकूण 7   रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त करण्यात आल्या  आहेत. यामाध्यमातुन सर्वेक्षण प्राधान्याने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.  पशु वैद्यकीय विभागाबरोबरच  ग्रामपंचायत तसेच वनविभाग पातळींवर निगराणीचे आदेशही त्यांनी  दिले. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला यावेळी  जिल्हाधिकारी यांनी दिल्या.  जिल्हास्तरीय   नियंत्रण कक्ष कार्यान्वित  करण्यात आला आहे.ठाणे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीखाली हा नियंत्रण कक्ष  स्थापन केला आहे. या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन शासनाच्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सुचना दिल्या.

कावळे, पोपट,बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी  मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास तात्काळ  माहिती द्यावी.  तसेच व्यावसायीक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये  माहिती दयावी. याचबरोबरच  जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक ०२२- २५६०३३११ तसेच  पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनीक्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन माहिती कळवावी. नागरिकांनी मृत पक्षांचे  शव विच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी केले आहे.

बर्ड फ्ल्यू संदर्भात अपूऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करु असा सक्त इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर  यांनी  यावेळी दिला.पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तीं मास्क आणि सँनिटायझर तसेच स्वच्छता पाळतील याची दक्षता घ्यावी तसेच किरकोळ व होलसेल विक्रेत्यांनी  देखील योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सुचना श्री नार्वेकर यांनी यावेळी केल्या.

अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!