मुंबई विश्व

स्पुटनिक व्ही लस ही कोविड-१९शी लढण्याच्या योग्य परिणामकारतेची आहे

मॉस्को / मुंबई ( आरती मुळीक – परब ) :   – स्पुटनिक व्हीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांचा डेटा व हंगामी स्वरूपाची निष्पत्ती चांगली झाली आहे. हे जगातील सर्वांत जुन्या वैद्यकीय लॅन्सेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे. अशी घोषणा  रशियन फेडरेशनमधील आरोग्य मंत्रालयाचे गॅमालिया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी केली आहे. यामुळे लशीची परिणामकारकता व सुरक्षितता यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्पुटनिक व्ही ही लस सखोल अभ्यास झालेल्या मानवी अॅडेनोव्हायरल व्हेक्टर्स प्लॅटफॉर्मवर आधारित असून, कोरोनाविषाणूविरोधातील ही जगातील पहिली नोंदणीकृत लस आहे.

रॅण्डम पद्धतीने झालेल्या, डबल-ब्लाइंड तसेच प्लसिबोद्वारे नियंत्रित क्लिनिकल चाचणीच्या हंगामी परिणामकारता विश्लेषणात १९,८६६ स्वयंसेवकांचा डेटा समाविष्ट करण्यात आला होता (यातील १४,९६४ जणांना लस, तर ४९०२ जणांना प्लसिबो देण्यात आले). २१ दिवसांच्या अंतराने दिल्या गेलेल्या स्पुटनिक व्हीच्या दुहेरी डोस उपचारांची कोविड-१९ विरोधातील परिणामकारकता ९१.६ टक्के दिसून आली. ही मोजणी कोविड-१९च्या ७८ कन्फर्म्ड केसेसच्या विश्लेषणाच्या आधारे करण्यात आली. या रुग्णांपैकी ६२ जण प्लसिबो गटातील तर १६ जण लस दिलेल्या गटातील होते. स्पुटनिक व्हीमुळे दमदार स्वरूपाचा ह्युमोरल व सेल मेडिएटेड रोगप्रतिकार प्रतिसाद निर्माण झाल्याचे दिसून आले.

गॅमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिन्स्टबर्ग म्हणाले:

“स्पुटनिक व्हीच्या क्लिनिकल चाचण्यांची निष्पत्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षण करणाऱ्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली हे कोविड-१९ साथविरोधी लढ्यामधील मोठे यश आहे. रशियातील लशीची सुरक्षितता व उच्च परिणामकारकता सादर करण्यात आलेल्या शास्त्रीय डेटातून दिसून येते. मी या संस्मरणीय यशाबद्दल गॅमालिया नॅशनल रिसर्च सेंटरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. यापूर्वीही मानवी अॅडेनोव्हायरसेच्या आधारे अनेक लशी निर्माण करण्यात आल्या आहेत आणि भविष्यकाळातही अनेक लशींच्या विकासासाठी हे अत्यंत उत्तम साधन आहे.”

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रेव म्हणाले:

“लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीमुळे स्पुटनिक व्ही ही जगातील पहिली नोंदणीकृत लस आहे हे तर सर्वांपुढे आलेच आहे, शिवाय, ही लस सर्वोत्तम लशींपैकी एक असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. ही लस तीव्र स्वरूपाच्या कोविड-१९पासून संपूर्ण संरक्षण करते हे स्वतंत्र्यरित्या जमवलेल्या तसेच परीक्षण करण्यात आलेल्या डेटावरून स्पष्ट होते. ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक ठरलेल्या जगातील तीन लशींपैकी स्पुटनिक व्ही ही एक आहे. मात्र, सुरक्षितता, साठवणीसाठी +२ ते +८ अंश सेल्सिअस तापमान पुरेसे असल्यामुळे वाहतुकीतील सुलभता व परवडण्याजोगी किंमत या निकषांवर स्पुटनिक व्ही या अन्य लशींवर मात करते. स्पुटनिक व्ही ही अखिल मानवजातीसाठी असलेली लस आहे.”

पूर्वपरीक्षित अभ्यासांच्या निष्पत्तींनुसार, नवीन कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या अत्यंत तीव्र केसेसमध्येही ही लस पूर्ण संरक्षण देते. गटातील कन्फर्म्ड कोविड-१९ केसेसमधील तीव्र स्वरूपाच्या केसेसपैकी २० प्लसिबो गटात होत्या. लस दिलेल्या गटात कोणालाही तीव्र लक्षणे दाखवणारा कोविड-१९ झाला नाही. रोगप्रतिकार प्रतिसाद विकसित होण्यासाठी वेळ लागत असल्याने, लसीकरणानंतर पहिल्या आठवड्यात तीव्र स्वरूपाच्या कोविड-१९विरोधातील संरक्षणात लस दिलेला गट व प्लसिबो दिलेला गट यांच्यात फारसा फरक दिसून आला नाही. मात्र,  लसीकरणानंतर ७ ते १४ दिवसांच्या काळात लशीची परिणामकारकता वाढून ५० टक्के झाली, १४ ते २१ दिवसांच्या काळात ती ७४.१ टक्के झाली आणि २१व्या दिवसापासून ती कोरोनाविषाणूच्या तीव्र लक्षणांविरोधात संरक्षणाबाबत १०० टक्के झाली.

महत्त्वाचे म्हणजे या अभ्यासातील २,१४४ स्वयंसेवक ६० वर्षांवरील वयोगटातील होते. लस गटातील सर्वांत वृद्ध व्यक्ती ८७ वर्षांची, तर प्लसिबो गटातील सर्वांत वृद्ध व्यक्ती ८४ वर्षांची होती. याचा अर्थ वयोवृद्धांसाठीही ही लस अत्यंत सुरक्षित आहे. लशीची परिणामकारकता वृद्धांमध्ये ९१.८ टक्के होती. संख्याशास्त्राच्या दृष्टीने १८-६० वयोगटातील परिणामकारकतेहून ती कमी नव्हती. यातून लशीची उत्तम सुरक्षितता व इम्युनोजेनिसिटी दिसून येते.

स्पुटनिक व्ही सुरक्षिततेबाबतही उत्तम ठरली आहे: चाचण्यांमध्ये सहभागी सदस्यांपैकी ६८ जणांमध्ये कोविड-१९शी निगडित नसलेल्या गंभीर  प्रतिकूल घटनांचे (एसएई) ७० प्रकार दिसून आले: यापैकी ४५ जण लस दिलेल्या गटामधील होते, तर २३ प्लसिबो दिलेल्या गटामधील होते. यातील कोणताही प्रकार लसीकरणाशी संबंधित नव्हता, याची पुष्टी इंडिपेंडंट डेटा मॉनिटरिंग कमिटीने केली. सर्वाधिक प्रतिकूल घटना (९४ टक्के) या सौम्य स्वरूपाची फ्लूसारखी लक्षणे, इंजेक्शनच्या ठिकाणी रिअॅक्शन येणे, डोकेदुखी व अशक्तपणा यांसारख्या होत्या.

स्पुटनिक व्ही लस दिली जाते, तेव्हा कोरोनाविषाणूही शरीरात प्रवेशच करत नाही, कारण, लशीच्या बाहेरील प्रोटिन आवरणातच त्याच्या जनुकीय माहितीचा एक भाग असतो, याला ‘स्पाइक्स’ असे म्हटले जाते. यामुळे लसीकरणानंतर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पूर्णपणे नाहीशी होते व शरीरामध्ये स्थिर रोगप्रतिकार प्रतिसाद निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते.

याशिवाय स्पुटनिक व्ही एडीफाइव्ह आणि एडीट्वेंटीसिक्स या दोन वेगवेगळ्या व्हेक्टर्सचा वापर, दोन स्वतंत्र शॉट्समध्ये करते. यामुळे दोन्ही शॉट्ससाठी एकच व्हेक्टर वापरणाऱ्या लशींच्या तुलनेत कोरोनाविषाणूविरोधात अधिक प्रभावी संरक्षण तयार होते. दोन वेगवेगळे व्हेक्टर्स वापरून स्पुटनिक व्ही संभाव्य न्युट्रलायझिंग प्रभाव टाळते व दीर्घकाळ टिकणारा रोगप्रतिकार प्रतिसाद निर्माण करते.

स्पुटनिक व्हीची १६ देशांमध्ये यापूर्वीच नोंदणी झाली आहे: रशिया, बेलारूस, सर्बिया, अर्जेंटिना, बोलिव्हिया, अल्जेरिया, पॅलेस्टाइन, व्हेनेझुएला, पॅराग्वे, तुर्कमेनिस्तान, हंगेरी, यूएई, इराण, गयाना प्रजासत्ताक, ट्युनिशिया आणि आर्मेनिया.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पुटनिक व्हीचे लसीकरण पुढील १२ देशांमध्ये सुरू होणार आहे: बोलिव्हिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, पॅलेस्टाइन, यूएई, पॅराग्वे, हंगेरी, आर्मेनिया, अल्जेरिया, बोस्नियन सर्ब प्रजासत्ताक, व्हेनेझुएला आणि इराण.

१२ पैकी १० देशांमध्ये नागरिकांमध्ये प्रसारासाठी मंजुरी मिळालेली स्पुटनिक व्ही ही पहिली कोरोनाविषाणूविरोधातील लस असेल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!