ठाणे

ठाणे शहरातील मिसिंग लिंक आणि वाहतूक कोंडी समस्येमुळे प्रभाग समितीनिहाय पे अँन्ड पार्कींग जागेचे पुनर्सर्वेक्षण करून जागा निश्चित करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश – बिपीन शर्मा आयुक्त.


ठाणे (ता १२, संतोष पडवळ ) : ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस शाखा यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देतानाच शहरात वाहन पार्कींगकरिता प्रभाग समिती निहाय 15 मार्च पर्यंत पे अँन्ड पार्कींगसाठी जागेचे पुनर्सर्वेक्षण करून पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिले. दरम्यान रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या लक्झरी बसेस पार्किंगसाठी जागा शोधून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 


         सद्यस्थितीत शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच मिसिंग लिंकचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिका अधिका-यांसोबत आढावा बैठक घेवून वाहतूक कोंडी संदर्भातील अनेक गोष्टींवर वाहतूक विभागाशी सकारात्मक चर्चा केली. 


        यावेळी बोलताना महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी शहरात वाहन पार्कींगकरिता प्रभाग समिती निहाय 15 मार्च पर्यंत पे अँन्ड पार्कींगच्या जागेचे  पुनर्सर्वेक्षण करून जागा निश्चित करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिले.  त्याचबरोबर शहरातील प्रमुख रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या लक्झरी बसेस पार्किंगसाठी जागा शोधणे तसेच रस्त्यांवर उभ्या करण्यात येणाऱ्या शाळांच्या बसेसकरिता पार्किंगची व्यवस्था काय करता येतील याबाबत वाहतूक पोलिस विभागाने पर्याय शोधावेत असे सांगितले. तसेच शहरात ज्या ठिकाणी गतिरोधक नाहीत त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक टाकण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या. विशेषत: उपवन परिसरात ज्या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने चालविली जातात त्या ठिकाणी प्राधान्याने गतीरोधक बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले. 


       या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी प्रभाग समितीनिहाय वाहतूक समस्येचा आढावा घेवून एमएमआरडीए आणि एमएसआरडी यांच्याशी समन्वय साधून रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग, स्पॉट लाईट, गतिरोधक टाकणे, रस्त्याची निगा व देखभाल, दुचाकी करिता साईंन बोर्ड, कार पार्किंग साईंन बोर्डन, नो पार्किंग,नो एंट्री बोर्ड स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेवून लावणे, मिसिंग लिंक, रस्त्यांवरील भंगार व बेवारस वाहने, विविध ठिकाणी पार्किंगचे पिवळे व पांढरे पट्टे नव्याने मारणे आदी कामे तात्काळ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


       या बैठकीस यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह वाहतूक विभागाचे आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!