गुन्हे वृत्त

लग्नास नकार दिल्याने आई व मुलीची हत्या तर वडील गंभीर जखमी.

पनवेल दि.19 (संतोष पडवळ )- पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत. 

         तालुक्यातील दापोली येथील अरूण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटूंबिय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो. तो त्याच भागात डंपर चालक म्हणून कामाला होता. हे सर्व मराठवाडा विभागातील असून ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. सदर आरोपीचे पहिल्या पत्नीचे निधन झाले असल्याने त्याने दुसरे लग्न करण्यासाठी सुजाता (वय-18) हिला मागणी घातली होती. परंतु तिच्या घरच्यांनी वारंवार नकार दिला होता. आज सकाळीसुद्धा आरोपीने त्यांच्या घरी जाऊन पुन्हा लग्नाचा विषय छेडला असता मुलीची आई सुरेखा (वय-37) व वडील सिद्धार्थ (वय-41) यांनी नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले व तो पळून गेला. या घटनेत आई सुरेखा व मुलगी सुजाता या गंभीररित्या जखमी होऊन मयत झाल्या आहेत. तर वडीलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांचे पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके घटनास्थळी रवाना झाली. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेऊन सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. या घटनास्थळी डॉगस्कॉड, फिंगर प्रिंट्स आदींना पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.      

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!