गुन्हे वृत्त

५० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी ‘एसीबी’ च्या जाळ्यात

वाकड,पुणे – गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई आज (सोमवारी, दि. २२) वाकड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. 

पोलीस नाईक सचिन जाधव असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 498 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

अटकेची प्रक्रिया करून जामिनावर सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी पोलीस नाईक जाधव याने दोन लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक लाख देण्याचे ठरले. त्यातील ५० हजार रुपये अगोदर आणि ५० हजार रुपये दुस-या टप्प्यात देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने आज सापळा लावला. पोलीस नाईक जाधव याला ५० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!