महाराष्ट्र

मराठी रंगमंच कलादालनातून मराठी रंगभूमीची वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. 24 : बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची निर्मिती करण्यात येत आहे,  यातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास, वैशिष्ट्ये आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी, या पद्धतीने या रंगमंच कला दालनाचे काम व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मराठी रंगमंच कला दालनाच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह विविध विभागांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कलादालनाचे काम इतके आकर्षित असावे की बाहेरच्या व्यक्तीस आत यावे असे वाटावे आणि आत आलेल्या व्यक्तीस मराठी रंगभूमीची देदीप्यमान वाटचाल अनुभवल्याचा आनंद मिळावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कलादालनाच्या निर्मितीमध्ये नाट्यक्षेत्रातील नामवंत तज्ञ आणि मान्यवरांचा सहभाग घेण्यात यावा.

मराठी रंगमंच कलादालनात नाटकाचा उगम ते आतापर्यंतचा प्रवास उलगडला जावा, संगीत, व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमी, दलित, कामगार नाट्य चळवळ आणि त्याची वैशिष्ट्ये माहित व्हावीत, जेष्ठ मराठी नाटककार, नेपथ्यकार, लेखक, नाट्य कलावंत यांचीही माहिती येथे उत्तम मांडणीतून उपलब्ध व्हावी असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.विषय वस्तू समितीची स्थापना

कलादालनाच्या  निर्मितीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  पूर्व उपनगराचे  अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विषय वस्तू समितीची (कंटेंट डेव्हलपमेंट कमिटी) स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्वश्री आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, मुक्ता बर्वे, संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय,  मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, उपायुक्त  परिमंडळ 1 बृहन्मुंबई महानगरपालिका आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नाट्य क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांना आमंत्रित म्हणून समितीमध्ये निमंत्रित करता येणार आहे. कला दालनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपयांचा निधीही  देण्यात येणार आहे. विषय वस्तू समितीची पहिली बैठक 27 फेब्रुवारी रोजी असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!