महाराष्ट्र

रोपवनात शाळकरी मुले बागडताना पाहण्यासाठी भारतीताईंचे विशेष प्रयत्न

नंदुरबार दि.28 – नंदुरबार जवळील बंधारपाड्याच्या रोपवाटिकेत भारती सयाईस सहजपणे वावरताना दिसतात. प्रत्येक रोपाकडे पाहताना त्यांच्या नजरेतला आपलेपणा स्पष्टपणे दिसतो. परिसरातील रोपांविषयी त्या भरभरून बोलतात. एक स्त्री म्हणून त्या रोपांविषयी असलेली मातृत्वाची  आणि स्नेहाची भावना त्यांच्या कार्यातून दिसते. रोपवाटिकेच्या ओसाड परिसरात रोपवनाची निर्मिती त्यांनी केली आहे. या रोपवनात शाळकरी मुलांना बागडताना पाहण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करीत आहेत.

भारती गेल्या तीन वर्षापासून या रोपवाटिकेत वनपाल म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाची ही सर्वात मोठी रोपवाटिका आहे. त्याचे व्यवस्थापन सांभाळताना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी खडकाळ भागावर मनरेगा अंतर्गत रोपवन उभारण्याचे आव्हान स्वीकारले आणि तातडीने ते अंमलातही आणले. त्यासाठी आवश्यक खड्डे त्यांनी तात्काळ तयार केले.

टोकरतलाव काठच्या या भागात 800 झाडे लावली  आहेत आणि त्यातली 100 टक्के झाडे वाढत आहेत.  विशेष म्हणते अधिकांश झाडे वड आणि पिंपळाची आहेत. परिसरातील स्थानिकांना फळझाडे  लावण्यासाठी त्या प्रोत्साहित करतात. रोपवाटिकेचा परिसर निसर्गरम्य व्हावा यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात.

रोपवाटिकेत लहानशी बाग तयार करून त्यात कमळासाठी विशेष कुंड तयार करण्याची कल्पकता असो वा रोपवनातील झाडे वाढण्याकडे जातीने लक्ष देणे असोपरिसर हिरवागार होऊन शाळेच्या मुलांनी तिथे भेट द्यावी असा त्यांचा प्रयत्न आहे. रोपवाटिकेसाठी गतवर्षी सोलर पंपही बसविण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 14 लाखापेक्षा अधिक रोपे तयार करण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी केले. अचानक उद्दीष्ट प्राप्त झाल्यावरही न डगमगता त्यांनी स्थानिक मजुरांशी संवाद साधला आणि त्यांचा सहभाग मिळविला. पाण्याची कमतरता असताना रोपे जिवंत राहतील आणि त्यांचे वाटप गावपातळीवर होईल याची विशेष दक्षता त्यांनी घेतली. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. वड-पिंपळाची रोपे तयार करण्याचे कठीण असणारे काम त्यांनी मजुरांच्या सहकार्याने केले.

आज रोपवाटिकेत ३० ते ३५ प्रकारची रोपे तयार होतात. २०२१ साठी २ लाख रोपे तयार असून एक लाख रोपांची नव्याने तयारी सुरू आहे. त्यांना वनरक्षक सविता धनगर आणि वनमजूर शफी खाटीक याचे सहकार्य मिळत आहे. स्थानिकांना वृक्षाच्या माध्यमातून उपजिविकेचे साधन मिळावे अशी इच्छा बाळगून त्यादिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

आपला स्वभाव आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे रोपवाटिकेतील मजुरांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतात आणि हेच त्यांच्या कामातले खरे यश आहे. त्यांच्या नजरेतले रोपवन उभे करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना म्हणूनच सर्व मजुरांचे मनापासून सहकार्य मिळते. त्यांनी रोपवन तयार होईपर्यंत त्याचठिकाणी राहावे ही मजुरांची प्रेमळ प्रतिक्रियाही त्यामुळेच असावी.

वृक्ष लागवडीत महिलांचा सहभाग वाढवायचा आहे. त्यांना संगोपनाची कला मुळातच अवगत असते. त्यातून उघड्या-बोडक्या डोंगरावर हिरवाई यावी असे मनापासून वाटते  आणि त्यासाठी काम करायला आवडेल. रोपवनातून शाळकरी मुलांनी माहिती घ्यावी आणि निसर्ग संरक्षणात सहभाग घ्यावा यासाठी ते वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

–भारती सयाईस, वनपाल

भारती यांना रोपवाटिका तयार करण्याचा चांगला अनुभव आहे. विशेष म्हणजे आपल्या कामासाठी इतरांचे सहकार्य मिळविण्याची कला त्यांना अवगत आहे. आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्यात आनंद मानतात आणि म्हणूनच रोपवन दृष्य स्वरुपात येत आहे.

  स्नेहल अवसरमलवनक्षेत्रपाल

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!