महाराष्ट्र

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदा सज्ज – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ८ एप्रिल – कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासन व्यापक उपाय योजना राबवित आहे. सद्य परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता  सर्वांकडून कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदा सज्ज असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची बैठक बोलावली. सोमवारी अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील महापालिका आणि नगर परिषदांची बैठक तर मंगळवारी कोकण, नागपूर व पुणे विभागाची बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. मंत्री श्री. शिंदे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतानाच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

मंत्री शिंदे म्हणाले कि, कोरोनावर मात करण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना आखून त्यांची अंमलबजावणी कार्यक्षमपणे करण्यात यावी. कोरोनावरील उपाययोजनांसाठी तातडीची बाब म्हणून नगरविकास विभागातून निधी सोबतच सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल. कोरोना रुग्णालये, विलगीकरण केंद्रे यांची क्षमता वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. कोरोना विलगिकरण केंद्रांमधील सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात यावा. विलगिकरण केंद्रांमध्ये फायर ऑडिट करण्यात यावे. महिला रुग्णांच्या सुरक्षतेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी.  होम क्वारंटाईन रुग्णांवर विशेष लक्ष ठेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावी. कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. कोरोना उपाययोजना करताना अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे लसीकरण पूर्ण करून त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. आपण सर्व एकत्रितपणे कोरोना विरोधातील हे युध्द जिंकू असा आत्मविश्वास मंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आरोग्य केंद्रांना स्वतः भेट देऊन व दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील कोरोना उपायोजनांबाबत सातत्याने आढावा घेत आहे. रुग्णवाहिका, बेड्स, ऑक्सिजन, लसीकरण, व रेमडेसिवीर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रुग्णांच्या वैद्यकीय सेवेत अथवा पौष्टिक आहार पुरविण्या संबंधित कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद मंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या पूर्वी देखील मंत्री शिंदे यांनी राज्यात पूर्ण लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या नागरिकांसाठी कार्यकर्त्यांच्या साहाय्याने गहू पीठ, तांदूळ, तेल, कडधान्य आणि साखर इत्यादी अन्न – धान्याचा काही लाख लोकांना पुरवठा केला होता. यावेळी पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांना तसेच चित्रपटातील बॅकस्टेज कलाकार आणि रिक्षाचालकांना देखील अन्नधान्य पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे पालघरमधील मासेमारी करणार्‍या एक लाखाहून अधिक कुटुंबांना धान्य पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना रूग्णांच्या त्वरित उपचारांसाठी १० डायलिसिस युनिट्स, ७६ बेडचे आयसीयू, एक्सरे रूम, एक प्रयोगशाळा आणि सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज असे अकराशे बेडचे रुग्णालय अवघ्या काही दिवसात उभे केले होते. या साठी ग्लोबल इम्पॅक्ट हब या दहा मजली इमारतीची निवड केली होती. त्याचप्रमाणे आता ठाण्यात महापालिकेमार्फत तीन नव्या कोव्हीड रुग्णालयांच्या माध्यमातून २५०० बेड्स रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!