गुन्हे वृत्त

वाघाचे कातडे, पंज्याची तस्करी करणाऱ्या टोळीला कोनगाव पोलीसांनी केले गजाआड

ठाणे : राष्ट्रीय वन्यजीव प्राण्याची म्हणजेच “पट्टेरी वाघ” याची कातडी व पंज्याची तस्करी करणारी चौकडी कोनगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या तस्करांकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रशांत सुशिलकुमार सिंग, (वय २१, रा. वडाळा पुर्व, मुंबई), चेतन मंजे गौडा (वय २३ रा.वडाळा, मुंबई), आर्यन मिलींद कदम (वय २३ रा. वडाळा पुर्व, मुंबई) आणि अनिकेत अच्युत कदम (वय २५ रा. सायन कोळीवाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.

भिवंडी तालुक्यातील नाशिक-मुंबई बायपास महामार्गावर ठाकुरपाडा गावाच्या हद्दीतील बासूरी हॉटेल समोर काही तस्कर “पट्टेरी वाघ” या वन्य प्राण्याचे कातडे व पंजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना मिळाली. त्याअनुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत पाटील यांनी वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यु फाऊन्डेशनचे वन्यजीव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांना घेऊन सापळा रचला. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९(३), ४४, ४८(अ), ४९(बी), ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच, लाखो रुपये किंमतीचे “पट्टेरी वाघ” या राष्ट्रीय वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले, कडक झालेले काळे-पिवळे पट्टे असलेले कातडे आणि पाच नखे असलेला पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला.

लाखो रुपये किंमतीचे पट्टेरी वाघाचे कातडे कुठून आणले व कोणाला विक्री करण्यासाठी मुंबईवरून नाशिक महामार्गावर आले होते? याचा तपास पोलिसांनी सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली आहे. तर पोलीस उप निरीक्षक पराग भाट, सहा. पोलीस उप निरीक्षक, वामण सुर्यवंशी, पो.हवा राजेश शिंदे, संतोष मोरे, पो.ना विनायक मासरे, संतोष पवार, अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले व गणेश चोरगे या पोलीस पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!